श्रीवर्धन आगार नवीन बसगाड्यांच्या प्रतीक्षेत

श्रीवर्धन आगार नवीन बसगाड्यांच्या प्रतीक्षेत

Published on

श्रीवर्धन आगार नवीन बसगाड्यांच्या प्रतीक्षेत
भंगार अवस्थेतील बसमुळे प्रवाशांचे हाल; मंत्री आदिती तटकरे यांच्या आश्वासनाचा विसर
श्रीवर्धन, ता. ३ (वार्ताहर) ः कोकण विभागात आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने एकेकाळी अव्वल स्थानावर असलेले श्रीवर्धन एसटी आगार सध्या गंभीर अडचणींचा सामना करीत आहे. मध्यम लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील अनेक फेऱ्यांसाठी आजही अत्यंत नादुरुस्त, भंगार अवस्थेतील बसगाड्या देण्यात येत असून त्यामुळे प्रवासीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आगाराला अत्याधुनिक नवीन बसगाड्यांची नितांत गरज असताना, बीएस-६ प्रकारच्या नव्या बस अद्याप दाखल न झाल्याने श्रीवर्धन आगार नवीन गाड्यांच्या प्रतीक्षेत आहे.
२०१५-१६ या कालावधीपासून नियोजनशून्य कारभार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा मोठा फटका श्रीवर्धन आगाराला बसला आहे. उत्पन्नात अग्रेसर ठरणाऱ्या अनेक महत्त्वाच्या फेऱ्या बंद पडल्या असून, आगाराची एकेकाळची ओळख हळूहळू कमी होत चालली आहे. आजही अनेक बसगाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. बसमधील आसने खिळखिळी झालेली आहेत, अनेक बसगाड्यांच्या काचा तुटलेल्या किंवा व्यवस्थित बसवलेल्या नाहीत. रात्रपाळीच्या बसगाड्यामध्ये दिव्यांची व्यवस्था नादुरुस्त असून, भर रस्त्यात बस बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही प्रसंगी चालत्या बसचे चाक निखळण्यासारख्या धक्कादायक घटनाही श्रीवर्धन आगाराच्या बाबतीत घडल्या असून, त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आजही श्रीवर्धन आगाराला मध्यम लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील फेऱ्यांमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे; मात्र याच मार्गावर सातत्याने नादुरुस्त बस देण्यात येत असल्याने प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत आहेत. अनेक ग्रामीण भागातील फेऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने गावागावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कामानिमित्त श्रीवर्धन येथे येणारे अधिकारी-कर्मचारी, तसेच महाविद्यालये व विद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी यांना वेळेवर व सुरक्षित प्रवास न मिळाल्याने अडचणी वाढल्या आहेत. श्रीवर्धन आगारात उर्वरित बीएस-६ प्रकारच्या अत्याधुनिक बसगाड्या तातडीने दाखल कराव्यात. नवीन बस आल्यास केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर आगाराचे उत्पन्नही पुन्हा वाढू शकते, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
..............
मंत्री आदिती तटकरे यांना आश्वासनाचा विसर
श्रीवर्धन आगारात अत्याधुनिक बीएस-६ प्रकारच्या पाच बसगाड्या दाखल झाल्या असून, काही कालावधीत आणखी पाच नव्या बीएस-६ गाड्या प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत, असे आश्वासन महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी एका लोकार्पण सोहळ्यावेळी दिले होते. हा लोकार्पण सोहळा १४ एप्रिलला पार पडला होता; मात्र त्या आश्वासनाला जवळपास नऊ महिने उलटूनही अद्याप एकही बीएस-६ बस श्रीवर्धन आगारात दाखल झालेली नाही. त्यामुळे प्रवासीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आश्वासनाचा विसर पडला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.............
बीएस-६ बसची वैशिष्ट्ये
बीएस-६ प्रकारच्या बस या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंग पॉइंट, पुश-बॅक व आरामदायक आसने, रिव्हर्स कॅमेरा, यूएसबी यंत्रणा, प्रवाशांना सूचना देण्यासाठी माईक व आधुनिक साउंड सिस्टीम अशा सुविधा या बसमध्ये उपलब्ध आहेत. सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या बसच्या प्रतीक्षेत श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासी डोळे लावून बसले आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नवीन बस आगारात दाखल कराव्यात, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com