

वाशी, ता. ५ (बातमीदार) : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या उन्नत मार्गातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. उन्नत मार्गाच्या दोन्ही टप्प्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे या वर्षा अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यामुळे लवकरच नवीन फ्री-वे प्रवासासाठी मोकळा होणार आहे.
ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करण्यासाठी पारसिक डोंगरातून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. मे २०१८ मध्ये ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा ३.४३ किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. कोरोनाचा कालावधीत रखडलेले काम, त्याचबरोबरच सिडको आणि वनविभाग, सीआरझेड झोन परवानगी, रेल्वे ट्रॅकमुळे गर्डर टाकण्यास थांबलेली परवानगी, महावितरणची उच्च दाबाची वीजवाहिनी टाकणे, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-काटई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.
दरम्यान ऐरोली-कटाईच्या मार्गाच्या ३० डिसेंबरपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला असता यातील ८० ते ८५ टक्के काम पूर्ण करण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. सात वर्षांनंतर २०२६ मध्ये अर्थात नवीन वर्षात या फ्री-वेवरून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र जोड मार्गिका उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यांचे देखील काम प्रगतिपथावर असून या वर्षामध्ये काम पूर्ण होईल.
नवी मुंबईतील कोंडी कमी होणार
२०२६ मध्ये ऐरोली-काटई मार्ग खुला होणार आहे. हा मार्ग खुला झाल्यानंतर ऐरोली येथील अवजड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबईवरून ही वाहने थेट कल्याणकडे या उन्नत मार्गावरून पुढे जातील, त्याचप्रमाणे कल्याणकडून येणारी वाहने थेट मुंबईत पुढे मार्गस्थ होतील. महापे आणि शिळफाटा येथील कोंडी कमी होईल, तसेच या ठिकाणी होणारे अपघात टळतील.
हा मार्ग नेमका कसा आहे?
ऐरोली-काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागला गेला असून भाग-१ अंतर्गतचा रस्ता हा ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. या भागाची लांबी ३.४ किमी असून त्यामध्ये १.६९ किमीचा दुहेरी बोगदा व उर्वरित रस्ता व उन्नत मार्ग आहे. तर या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार ४-४ मार्गिकेचा आहे. ऐरोली ते ठाणे बेलापूर मार्ग, ठाणे-बेलापूर ते मुंब्रा बायपास आणि मुंब्रा बायपास ते कल्याण-काटई असा १२ किमीचा प्रत्येकी तीन मार्गिका असलेला हा रस्ता आहे. मुंबईच्या फ्री वेच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल असा हा उन्नत मार्ग असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.