बिनविरोधवरून गदारोळ

बिनविरोधवरून गदारोळ

Published on

बिनविरोधवरून गदारोळ
विरोधकांचा संताप; मतदारांची निराशा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : मतदानाआधी उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये शुक्रवारी (ता. २) स्पर्धा लागल्याचे दिसून आले. यामध्ये कल्याण-डोंबिवलीत भाजपने तर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. ठाण्यात सात, कल्याण-डोंबिवलीत २० तर भिवंडीत पाच उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत. मतदानाआधी बिनविरोधचे हे उगवलेले ‘पीक’ लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका आता सर्वस्तरातून होत आहे. दरम्यान, याविरोधात विरोधकांनी संताप व्यक्त केला मतदारांची ही फसवणूक असल्याचा आरोप होत आहे.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागातील १३१ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार होते; मात्र शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. तब्बल २५९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे हजाराची संख्या पार केलेल्या उमेदवारांची फौज ६४९ वर आता स्थिरावली आहे; पण या घडामोडीमध्ये सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. किंबहुना त्यांना बिनविरोध करण्याची शिवसेना शिंदे गटाची खेळी यशस्वी ठरली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डावे-उजवे हात समजल्या जाणाऱ्या शिलेदारांच्या आणि त्यांच्या पत्नींचा समावेश आहे.

वागळे इस्टेट येथील प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. फाटक यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर मोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला होता. येथूनच खऱ्या अर्थाने ‘बिनविरोधच्या’ वादाला सुरुवात झाली होती. या प्रभगातून राम रेपाळेसुद्धा बिनविरोध आले आहेत. दीपक वेतकर यांनाही बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न झाल्याचे समजते; मात्र त्यात अपयश आल्याने १८ प्रभागाचे पॅनेल बिनविरोध करण्याचे स्वप्न अर्धवट राहिले.

प्रभाग १४ मधील राष्ट्रवादी अ.प. गटाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आणि त्या आधी मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाच्या शीतल ढमाले बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून एकनाथ भोईर, प्रभाग पाचमधून जयश्री डेव्हिड आणि सुलेखा चव्हाण या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. मिळालेल्या माहितीवरून, कल्याण-डोंबिवलीत भाजपने सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आणले होते. त्याला ठाण्यातून टक्कर देण्यासाठी सूत्रे हलवली जात होती; मात्र अनेक अपक्ष आणि काही बंडखोर नॉट रिचेबल झाल्याने, काहींनी ‘ऑफर’ धुडकावल्याने या स्पर्धेत शिंदे गटाला बाजी मारता आली नसल्याची चर्चा आहे.

‘नोटा’चा पर्याय असताना बिनविरोध निवड कशी?
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी यांसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडणूक आले आहे. या बिनविरोध निवडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. ईव्हीएमवर असलेल्या ‘नोटा’ बटणाकडे त्यांनी लक्ष वेधले असून जर मतदारांना त्या उमेदवाराला नाकारण्याचा अधिकार ‘नोटा’ देत असेल तर शिल्लक राहिलेल्या एका अर्जासाठी मतदान झाले पाहिजे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मतदारांचा कौल महत्त्वाचा आहे. किती मतदार त्या उमेदवाराच्या विरोधात आहेत, हे ‘नोटा’च्या मतदानामुळे स्पष्ट होईल, अशी पोस्ट त्यांनी समाजमाध्यमावर टाकली आहे.

मनसेकडून निषेध आंदोलन
‘ठाकरे ब्रॅण्ड’समोर लढण्याची हिंमत नसल्याने सरकारी यंत्रणेचा गैरवापर सध्या ठाण्यात सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करून उमेदवारांना आमिष दाखवले गेले. त्याला बळी न पडणाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप करीत मनसेने शुक्रवारी कोर्टनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com