ठाणे-बेलापूर मार्ग होणार सुसाट!
ठाणे-बेलापूर मार्ग होणार सुसाट!
नवी मुंबई महापालिकेकडून तीन नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई ते ठाण्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ठाणे-बेलापूर मार्गाचा प्रवास येत्या काळात अधिक सुसह्य आणि गतिमान होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी व मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने, या महामार्गाच्या नूतनीकरणासह तीन नवीन उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५४४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे येथे एका उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर क्रिस्टल हाऊस ते पावणे, बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूम आणि रबाळे जंक्शन या तीन ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या उड्डाणपुलांसाठी लागणारा निधी केंद्र शासनाच्या ‘हॅम्प’ योजनेतून मिळणार आहे. याशिवाय, या संपूर्ण मार्गाच्या नूतनीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेकडून स्वतंत्रपणे सुमारे २२७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सध्या ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल हे दोन प्रमुख महामार्ग नवी मुंबई शहरातून जात असून, ऐरोली, रबाळे, तुर्भे आदी भागांत दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने हा रस्ता पूर्णपणे आधुनिक स्वरूपात विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नूतनीकरणाअंतर्गत खराब झालेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट ब्लॉक्स बदलणे, पावसाळ्यात जलद पाणीनिचरा होण्यासाठी नवीन गटारे बांधणे, तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करून हरितीकरण करण्याचा समावेश आहे. या कामांमुळे ठाणे, मिरा-भाईंदर, पनवेल, उरण आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा मार्ग अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे.
...................
गतिशिलतेचा आराखडा
नवी मुंबई महापालिका शहर गतिशील योजनेअंतर्गत ही कामे करणार आहे. या मार्गावरून मुंबई, ठाणे, पुणे, ऐरोलीमार्गे न्हावा शेवा तसेच दक्षिण भारताकडे जाणारी जड-अवजड वाहने सातत्याने धावतात. औद्योगिक व आयटी क्षेत्रामुळे इतर वाहनांचीही मोठी वर्दळ असते. नवी मुंबईत डाटा सेंटर, उद्योग, परकीय गुंतवणूक, रहिवासी व वाणिज्य संकुलांमुळे शहराचा वेगाने विकास होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्याने या रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उड्डाणपूल व अंडरपास उभारून रस्त्याची गतिशीलता वाढविण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, मे. आकार अभिनव कन्सल्टंट प्रा. लि. यांनी याची तांत्रिक व्यवहार्यता तपासली आहे.
...........
ठाणे-बेलापूर मार्गाच्या नूतनीकरणासह तीन नवीन उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. आगामी काळात प्रवासी व मालवाहतुकीत होणारी वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

