पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

Published on

‘विद्यार्थ्यांच्या विकासाला वाचनामुळे चालना’
पालघर(बातमीदार)ः मराठी वाचनसंस्कृती समृद्ध करण्याच्या उद्देशाने मनोविकास ग्रंथोत्सव, पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच निऑन फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने पुस्तक पेटी भेट उपक्रम पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा रोडखड, दाभोण पिलेना पाडा, टेम्भीखोडावे, घाटीम, कर्दळ, अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक तसेच आंभाण-मनोर येथील जिल्हा परिषद व संस्थेच्या शाळांना पुस्तकांच्या पेट्यांचे वितरण केले. यावेळी वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.
-------------------------------------
सोन्याची अंगठी मालकाला परत
विक्रमगड (बातमीदार)ः एस.के.कृषी पर्यटन येथील विवाह सोहळ्यात एकाची सोन्याची अंगठी रूममध्ये पडली होती. विवाहानंतर सकाळच्या सुमारास रूम साफसफाईचे काम सुरू असताना कृषी पर्यटनातील कर्मचारी गुरुनाथ चाकर ऊर्फ बागी यांना ही अंगठी आढळून आली. त्यांनी ती अंगठी तत्काळ पर्यटन केंद्राच्या काऊंटरवर जमा केली. यानंतर दुपारच्या सुमारास अंगठीचे मालक गुरुनाथ चाकर यांनी नीलेश औसरकर यांच्या मुलाकडे अंगठी सुपूर्द करण्यात आली. या कृतीमुळे कृषी पर्यटनचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
़़़़़़ः------------------------------
पोलिसांचा वर्धापन दिन साजरा
पालघर (बातमीदार)ः कोळगाव येथील पोलिस परेड मैदानावर महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या उपस्थितीत पोलिस परेड करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार सुशांत उपस्थित होते. यावेळी पालघर पोलिस दल नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून समाजात शांतता सुरक्षितता व विश्वास निर्माण करण्यासाठी कटिबद्द असल्याचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले. कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या परेडमध्ये पोलिस मुख्यालय तसेच विविध पोलिस ठाण्यामधील पोलिस अधिकारी, अमलदार सहभागी झाले. परेडचे संचलन उपविभागीय पोलिस अधिकारी जव्हार समीर मेहेर यांनी केले.
ः----------------------------------
आदिवासी युवकांना रोजगाराची संधी
पालघर : वाढवण पोर्ट स्किलिंग कार्यक्रमांतर्गत डहाणू येथे चारचाकी वाहन सेवा तंत्रज्ञ विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. स्थानिक युवकांना रोजगारक्षम कौशल्ये देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः युवकांसाठी राबविण्यात येत असून डहाणू तालुक्यातील दोन आदिवासी मुलांच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. आदिवासी मुलांचे वसतिगृह, वडकून येथील ४० तर आदिवासी मुलांचे वसतिगृह, आगर येथील ३६ असे ७६ विद्यार्थी प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींना वाहन चालवण्याचा परवाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवकांना रोजगारक्षम बनवणे, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे तसेच देशाच्या आर्थिक वाढीसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
़़ः--------------------------------------
कुंभार समाजाचे रविवारी स्नेहसंमेलन
विरार (बातमीदार)ः वसई-विरार-नालासोपारा कुंभार समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी (ता.४) सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान क्लब हाऊस गार्डन हॉल, युनिटेक फेज-२, वेस्ट एन्ड, सेंट झेवियर स्कूलजवळ, विरार (प.) येथे होणार आहे. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक व अन्य विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना जीवनगौरव, समाजभूषण, उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये वासुदेव कामणकर यांच्या ‌‘इदं न मम‌’ यांच्या स्वहस्तलिखित संग्राह्य धार्मिक पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन, संत शिरोमणी गोराकुंभार यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र तेर, जिल्हा धाराशिव येथील परमभक्त, त्यांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक ह.भ.प. दीपकजी खरात महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
़़़़़़़़़़़़----------------------------------------
अध्यक्ष, संचालकांची बिनविरोध निवड
पालघर(बातमीदार)ः जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी संतोष पावडे यांची दुसऱ्यांदा निवड तर वसई विभाग रिक्त संचालक पदी संघटना व पतपेढी समन्वयक मायकल गोन्साल्विस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालघर-ठाणे जिल्हा अशा दोन जिल्ह्यात कार्यरत असणारी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीचे २,७०० सभासद असून १७० कोटी भाग भांडवल आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा तालुक्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे सभासद आहेत. तसेच भाईंदर, वसई, सफाळे,पालघर आणि डहाणू येथे स्वतःच्या मालकीची कार्यालये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com