कुर्लावासीयांची समस्यांच्या गर्तेतून सुटका कधी!

कुर्लावासीयांची समस्यांच्या गर्तेतून सुटका कधी!

Published on

कुर्लावासीयांची समस्यांच्या गर्तेतून सुटका कधी!
- वाहतूक कोंडी, झोपड्यांचा पुनर्विकास, पावसाळ्यात तुंबणारे पाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : कष्टकरी कामगार वर्गाचे प्राबल्य असलेल्या कुर्ला विभागात आठ प्रभाग असून, तेथे अपुरा पाणीपुरवठा, पावसाळ्यात भरणारे पाणी, वाहतूक कोंडी, पुनर्विकासाची प्रतीक्षा अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. वर्षानुवर्षे त्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. पालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणूक आल्या की सर्वच पक्षांकडून कायापालट करण्याची आश्वासने मिळतात खरे, पण त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत कुर्लावासीय आपले मत कोणाच्या पदरात टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुर्ला पूर्व, पश्चिम आणि चुनाभट्टी परिसरात जुन्या चाळी, झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. एक बाजूला हायफाय बीकेसी आणि दुसऱ्या बाजूला झोपड्या असल्याने कुर्लावासीय नेहमीच पुनर्विकासासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांना फारसे यश आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच येथील झोपडपट्टी भागात पाणी भरते. तर उंचावरील भागात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. कुर्ला गार्डननजीक असलेले डम्पिंग ग्राउंड, मिठी नदीमुळे रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असला तरी त्याकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रमुख उमेदवार
प्रभाग क्र. १६३
काँग्रेस - सोनू जैन

प्रभाग क्र. १६५
भाजप - रुपेश पवार
काँग्रेस - मोहम्मद आश्रफ आझमी

प्रभाग क्र. १६६
शिवसेना - संजय तुर्डे
काँग्रेस - घनशाम भापकर
मनसे - राजन खौरनार

प्रभाग क्र. १६७
शिवसेना (ठाकरे) - सुवर्णा मोरे
काँग्रेस - सामन आर्शद आझमी

प्रभाग क्र. १६८
शिवसेना (ठाकरे) - सुधीर खातू
भाजप - अनुराधा पेडणेकर

प्रभाग क्र. १६९
शिवसेना - जय कुडाळकर
शिवसेना (ठाकरे) - प्रवीणा मोरजकर

प्रभाग क्र. १७०
भाजप - रंजीत दिवेकर
काँग्रेस - रेशमा मोमीन

प्रभाग क्र. १७१
शिवसेना - सान्वी तांडेल
काँग्रेस - संतोष जाधव

मतदारांची कोणाला साथ?
कुर्ला स्थानक, गोल बिल्डिंग, पत्रा चाळ, तकीयवार्ड, चुनाभट्टी, नेहरूनगर टिळकनगर परिसरात मराठी वस्ती मोठी आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार मंगेश कुडाळकर शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. दरम्यान, या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट, मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीचा कसा परिणाम होणार, लोक शिवसेना-मनसे युतीला पसंती देणार की भाजप-शिवसेना महायुतीला पसंती देणार की अन्य पर्याय पुढे आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाहतूक कोंडीची गंभीर समस्या
कुर्ला विभागात सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. शीव रेल्वेस्थानक येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई, पूर्व उपनगरांतील वाहने पश्चिम उपनगरांत, बीकेसीत जाण्यासाठी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा वापर करीत आहेत. त्यामुळे एलबीएस मार्गावर बीकेसी सिग्नल, कुर्ला डेपो, कमानी, कुर्ला स्थानक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असतानाही त्याचे निराकरण करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.

प्रमुख समस्या -
- मिठी नदीलगतच्या सखल भागात भरणारे पाणी, उन्हाळ्यात उंच भागातील पाणीटंचाई, एलबीएस मार्गावरची वाहतूक कोंडी, झोपडपट्टी परिसराचा पुनर्विकास, डम्पिंग ग्राउंडमुळे पसरणारी दुर्गंधी

निवडणुकीवर दृष्टिक्षेप
कुर्ला विधानसभा २०२४
- मंगेश कुडाळकर (शिवसेना) - ७२ हजार ७६३
- प्रवीणा मोराजकर (शिवसेना ठाकरे गट) - ६८ हजार ५७६

लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते
- वर्षा गायकवाड (मविआ) - ८२ हजार ११७
- उज्ज्वल निकम (महायुती) - ५८ हजार ५५३

कामगार वस्ती असलेल्या कुर्ला परिसरात आजही नागरी समस्या जैसे थे आहेत. अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा या समस्या गंभीर असून, त्याकडे सरकारचे, पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
- अजय कानविंदे, मतदार

कुर्ल्यात पुराच्या पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छतेबाबतही पालिकेने विशेष लक्ष द्यायला हवे.
- अलका ठोंबरे, मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com