मुंबई
स्त्री शिक्षण व सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
सावित्रीबाई फुले यांना कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत अभिवादन
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत अभिवादन करण्यात आले. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेला संघर्ष आजही समाजाला दिशा देणारा आहे. त्यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे मत नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी या वेळी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपणे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

