अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप?

अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप?

Published on

अंबरनाथमध्ये नवी युती?
शिवसेनेला डावलून भाजप-काँग्रेस हातमिळवणी करणार
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : राज्य आणि केंद्र पातळीवर परस्परविरोधी भूमिका घेणारे भाजप आणि काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये मात्र एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप शिवसेनेला डावलून काँग्रेसचा हात धरणार का, असा सवाल उपस्थित होत असून, ही संभाव्य युती अभूतपूर्व की राजकीय गरज, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी युती असताना, अंबरनाथमध्ये मात्र वेगळेच राजकीय समीकरण आकाराला येत आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-काँग्रेस सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र येत्या पालिका निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी सत्तास्थापनेची अधिकृत घोषणा जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि त्यांच्या नगरसेवकांनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिवसेनेचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. यामुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जवळीक अधिक वाढल्याची चर्चा रंगली असून, हे तिन्ही पक्ष मिळून शहराची सत्ता चालवण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संख्यीय बलाबल
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पराभूत करीत नगराध्यक्षपद मिळवले असले तरी सभागृहातील संख्याबळ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले असून, भाजपचे केवळ १४ नगरसेवक आहेत. परंतु भाजप शिवसेनेला डावलून काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक घेऊन सत्तास्थापन करण्याच्या तयारीत असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे पुढील निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षांकडून संकेत
भाजप-काँग्रेस सत्तास्थापनेबाबत तेजश्री करंजुले पाटील यांना विचारले असता, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, असे सांगत सूचक प्रतिक्रिया दिली. असे असतानाही भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ या भाजपच्या घोषणेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे सहमती दर्शवली आहे. करंजुले पाटील यांनी आपल्या भाषणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विशेष उल्लेख केल्याने या शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे.


दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी युतीचेच चित्र अंबरनाथमध्येही राहावे यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अलीकडेच भेट घेतली असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

नोट : बातमीसोबत छायाचित्र जोडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com