वाढत्या गुन्हेगारीविरोधात नगराध्यक्षा तेजश्री करंजुले मैदानात

वाढत्या गुन्हेगारीविरोधात नगराध्यक्षा तेजश्री करंजुले मैदानात

Published on

वाढत्या गुन्हेगारीविरोधात नगराध्यक्षा मैदानात
पोलिस उपायुक्तांकडे थेट तक्रार; रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : अंबरनाथ शहराच्या पूर्व व पश्चिम भागात गर्दुल्ले, चोरटे आणि नशेखोरांचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लक्षात घेता अंबरनाथच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी पदभार स्वीकारताच थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
तेजश्री करंजुले पाटील यांनी शुक्रवारी (ता. २) उल्हासनगर येथील परिमंडळ क्रमांक चार कार्यालयात पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीत अंबरनाथ शहरातील वास्तव परिस्थिती मांडत, नागरिक व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे त्यांनी पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
नगराध्यक्षा करंजुले यांनी शहरातील विविध भागांत गर्दुल्ल्यांचे अड्डे तयार झाल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडताना भीती वाटत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी अंबरनाथ आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीची पोलिस गस्त वाढवण्याची लेखी मागणी केली आहे.

पायी गस्त व हॉटस्पॉट्सवर कडक कारवाईची मागणी
केवळ वाहन गस्त पुरेशी नसून, गल्लीबोळांमध्ये पायी गस्त वाढवण्याची आवश्यकता असल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील असलेले भाग आणि नशाखोरांचा वावर अधिक असणाऱ्या हॉट स्पॉट्सवर कडक तपासणी मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली. यावर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित पोलिस ठाण्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे.

वाहतूक कोंडी व पाणीटंचाईचे प्रश्नही ऐरणीवर
नगराध्यक्षांच्या या सक्रिय भूमिकेचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून, सुरक्षेसोबतच इतर नागरी प्रश्नांकडेही लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील रहिवासी दिनेश देशपांडे यांनी अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तीव्र वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला आहे. खाद्यपदार्थ, फळ- भाजीविक्रेते आणि रिक्षाचालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे या चौकात दररोज मोठी कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, पश्चिम भागातील कोहजगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याची तक्रार रेखा नायर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com