वंचितांच्या प्रश्नांना रंगमंचावरून आवाज

वंचितांच्या प्रश्नांना रंगमंचावरून आवाज

Published on

वंचितांच्या प्रश्नांना रंगमंचावरून आवाज
गोरेगावात विद्यार्थ्यांचा ‘नाट्यजल्लोष’

मालाड, ता. ४ (बातमीदार) : ‘पाऊल थकलं नाही गड्या... रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या...’ शाहीर अमरशेख यांच्या चित्रपटातील हे गीत विद्या लोखंडे आर्त स्वरात गात असताना सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले. साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानच्या फिनिक्स प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘नाट्यजल्लोष’ कार्यक्रमाने उपस्थितांना एक भावनिक व वास्तवदर्शी अनुभव दिला.
रविवारी (ता. २८) गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे हा नाट्यजल्लोष उत्साहात पार पडला. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक मंगेश सातपुते हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. वस्तीतील मुलांचे पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच फिनिक्स प्रकल्पातून घडलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘वंचितांचा रंगमंच’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम गेली चार वर्षे सातत्याने राबवला जात आहे. नाटकाची संहिता लेखनापासून रंगमंचीय सादरीकरणापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत वस्तीतील मुले सक्रिय सहभाग घेतात. आपल्या भोवतालच्या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून मांडत त्यावर उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. नाट्यकर्मी प्रथमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाटके साकारली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिनिक्स प्रकल्पातील विद्यार्थिनी सारिका प्रसाद हिने केले. ‘खरा तो एकचि धर्म’, ‘हीच अमुची प्रार्थना’, ‘समतेच्या वाटेनं’ ही गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. कृपेश कांबळे याने ही गीते बसवली होती.

सरकारी शाळांची दुरवस्था

‘सात वर्ग दोन शिक्षक’, ‘कोण निवडून येणार’ आणि ‘लढा रोजगाराचा’ या तीन एकांकिका यंदा सादर करण्यात आल्या. सरकारी शाळांची दुरवस्था, स्थानिक निवडणुकांचे वास्तव आणि तरुणांपुढील रोजगाराचा प्रश्न या विषयांवर या एकांकिकांतून परखड भाष्य करण्यात आले. यासोबतच जयेश वाघमारे याने सादर केलेली ‘शेवटची लोकल’ ही एकपात्री उपस्थितांची दाद मिळवून गेली.

फोटो - 243

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com