पाचगणीचे शिक्षण मार्गदर्शन शिबिर पडले पार
संजीवन विद्यालयात शिक्षण मार्गदर्शन शिबिर
कल्याण पूर्व येथे ‘सकाळ एनआयई’अंतर्गत विशेष उपक्रम
कल्याण, ता. ४ (बातमीदार) : पाचगणी येथील संजीवन विद्यालय यांच्या वतीने विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण मार्गदर्शन शिबिर रविवारी (ता. ४) उत्साहात पार पडले. या शिबिरात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या मार्गदर्शन सत्रात विद्यालयाच्या प्रतिनिधींनी संस्थेचा शतकोत्तर वारसा, शैक्षणिक परंपरा आणि आगामी शैक्षणिक संधी याबाबत माहिती दिली.
संजीवन विद्यालयाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि सर्वांगीण शिक्षण कसे दिले जाते, याचे सविस्तर विवेचन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी घेतले जाणारे विविध उपक्रम, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी यावरही भर देण्यात आला. शिबिरात पालकांनी विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, निवासी सुविधा आणि सीबीएसई पद्धतीबाबत प्रश्न विचारले. विद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले.
१९२२ मध्ये सुरू झालेले संजीवन विद्यालय हे आज शतकोत्तर परंपरेचा वारसा पुढे नेत असून, पाचगणी येथील २२ एकरच्या निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सोयी असलेले हे एक आघाडीचे विद्यालय आहे. समाजातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकास हीच विद्यालयाची ओळख असल्याचे या शिबिरातून अधोरेखित करण्यात आले.
शाळेचा इतिहास :
१९२२ मध्ये रावसाहेब पंडित, कृष्णराव पंडित आणि त्यांचे स्नेही वसूनाना कलमकर या त्रयीने आपले आयुष्य शिक्षणासाठी समर्पित करण्याचे ठरवले आणि पाचगणीत या शाळेची स्थापना केली. त्यावेळी पाचगणीमध्ये पाश्चात्य मूल्ये जपणारी मिशनरी आणि अँग्लो-इंडियन विद्यालये मोठ्या प्रमाणात होती. या वातावरणात भारतीय मूल्ये आणि ''गुरुकुल'' पद्धतीचा वारसा जपणारी एक वेगळी विचारसरणी घेऊन तीन विद्यार्थ्यांसह संजीवन विद्यालयाची स्थापना झाली. या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढे आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले. शाळेची व्याप्ती आणि प्रतिष्ठा वाढवत नेल्यानंतर, १९५६ मध्ये पंडित बंधूंनी ३५० निवासी विद्यार्थ्यांसह या शाळेची धुरा बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडे सोपवली.
आज संजीवन विद्यालय ही एक चैतन्यदायी संस्था आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या जोरावर आगामी शतकात झेप घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आता येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा एका मोठ्या पब्लिक स्कूलचे सर्व निकष पूर्ण केले जातात. आमचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर गाढा विश्वास आहे. शिक्षण म्हणजे केवळ शैक्षणिक गुणवत्ता नसून त्यात सह-शालेय उपक्रम आणि सर्जनशीलतेचाही समावेश असतो, याची आम्हाला जाणीव आहे. संजीवनमध्ये आम्ही असे पोषक वातावरण देतो, जिथे वैयक्तिक कार्यक्षमता आणि उच्च नैतिक मूल्यांना प्रोत्साहन दिले जाते. आमचे समर्पित शिक्षक आणि कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत. असे यावेळी मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक धनंजय शिरूर म्हणाले.
या शिबिराला शाळेच्या अध्यक्षा शशी ठकार, विश्वस्त अनघा देवी, ॲड. जयंत गायकवाड, डॉ. संदीप काळे, समाजसेवक गोपीनाथ कुंदे, हनुमंत राजे, अनिता पुराणिक कुलकर्णी, माजी विद्यार्थी स्मिता पारी, अनंत जानस्कर, अविनाश शिंदे, माजी विद्यार्थी क्षितिज बोंगाळे, नेहा शाह, क्लॅरिस्टा डिसिल्वा, आकांक्षा बोंगाळे, पीयूष शाह, सचिन कांबळे, विनिता दाते आदींसह असंख्य पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

