गारगोटी–श्रीवर्धन बस सेवेसाठी प्रवासी वर्ग आग्रही
गारगोटी-श्रीवर्धन बससेवेसाठी प्रवासी आग्रही
लांब व वेळखाऊ मार्गामुळे बसला प्रतिसाद नाही
श्रीवर्धन, ता. ४ (वार्ताहर) : गारगोटी आगाराकडून काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली गारगोटी-श्रीवर्धन हिरकणी आरामबस आर्थिक उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून बंद करण्यात आली आहे. ही बससेवा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सुरू झाली होती. श्रीवर्धन हे पर्यटनस्थळ असल्याने गारगोटी व कोल्हापूर परिसरातील भाविकांना तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार होती; मात्र या बसचा मार्ग महाड- माणगाव- बोर्लीपंचतनमार्गे ठेवण्यात आल्याने प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढला. लांब व वेळखाऊ प्रवासामुळे प्रवासी कंटाळले आणि बसला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, उत्पन्न घटले व बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवासीवर्गाने गारगोटी- कोल्हापूर- श्रीवर्धन बसचा मार्ग कराड- चिपळूण- भरणा नाका- खेड- दापोली- श्रीवर्धन असा ठेवण्याची मागणी केली आहे. हा मार्ग तुलनेने कमी वेळखाऊ व सोयीचा असल्याने प्रवासीसंख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर सध्या थेट बससेवा उपलब्ध नसल्याने गारगोटी आगाराने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी आग्रही अपेक्षा श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासीवर्गाने व्यक्त केली आहे.
चौकट
भूमिका
हिरकणी आरामबसचे तिकीट दर साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली. ग्रामीण भागातील प्रवासी परवडणाऱ्या प्रवासाला प्राधान्य देतात. तिकीट दर हा एकमेव अडथळा ठरल्याने प्रवासीसंख्या कमी राहिली. हीच सेवा साध्या बसच्या स्वरूपात सुरू केल्यास प्रवासीसंख्या वाढून सेवा यशस्वी ठरू शकते, अशी ठाम भूमिका प्रवासीवर्गाने घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

