८७९ रणरागिणी रिंगणात!
८७९ रणरागिणी रिंगणात!
मुंबईत महिला उमेदवार अधिक; खुल्या वॉर्डांतही संधी
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : आता केवळ आरक्षित वॉर्डमध्येच नाही, तर खुल्या वॉर्डमधील मैदानही महिलांना खुले झाले आहे. आता लाडक्या बहिणींनाही उमेदवारी देण्याचे नवे धोरण पुढे आले आहे. मुंबईतील लढती प्रतिष्ठेच्या असल्या तरी भाजप, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस अशा सर्व बड्या पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्याचे नवे धोरण कायम ठेवले आहे. महापालिका निवडणुकीतला या वेळी दिसणारा हा नवा बदल असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकूण १,७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात ८७९ म्हणजे ५१.७० टक्के महिला उमेदवार आहेत. त्यापैकी ४१८ महिला मुख्य लढतीत आहेत. मुस्लिमबहुल आणि अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवनार, मानखुर्द, चेंबूर, शिवाजीनगर, गोवंडी या प्रभागांतून तब्बल ६८ महिला उमेदवार आपले राजकीय नशीब अजमावत आहेत. मुंबईत २२७ प्रभागांत निवडणुकीचा सामना रंगणार असून २२७ पैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या जादा असल्याने मुंबईत महिला राज असणार आहे.
...
महिला आरक्षित ११४ प्रभाग
मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातींसाठी एकूण १५ वॉर्ड राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आठ वॉर्ड, अनुसूचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव आहेत. त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवार आहे, तर ओबीसींसाठी मुंबईतील ६१ वॉर्ड राखीव आहेत. यामध्ये ३१ महिला ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ६१ वॉर्ड राखीव आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या ३१ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
...
भाजपचे महिलांना झुकते माप
भाजपचे एकूण १३७ उमेदवार या पालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांपैकी ७६ महिला आहेत आणि ६१ पुरुष आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपने सर्वाधिक महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे. ५० टक्के वॉर्ड महिलांसाठी आरक्षित जरी असले तरी खुल्या वर्गातही भाजपने महिलांना उमेदवारी दिली आहे.
...
महिलांच्या प्रमुख लढती
- महिलांना उमेदवारी दिली असली तरीही काही सामने एकतर्फी असतील. काही प्रभागांत सामने अटीतटीचे होतील.
- प्रभाग क्रमांक २०९ मध्ये शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांची लढत मनसेच्या हसीना माहीमकर यांच्याशी होणार आहे.
- १९१ या प्रभागात शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचा सामना शिंदे सेनेच्या पहिल्यांदाच उमेदवारी लढत असणाऱ्या प्रिया सरवणकर यांच्यासोबत होणार आहे.
- २०३ या प्रभागातील शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा पेडणेकर या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचा सामना शिंदे सेनेच्या समिधा भालेकर यांच्याशी होईल.
- माजी महापौर आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात १९९ प्रभागांतून शिंदे गटाच्या रूपाली कुसुंबे निवडणूक लढवत आहेत.
- शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांच्याविरोधात तेजस्वी घोसाळकर या प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

