मधाचे पोळे होताहेत दुर्मिळ

मधाचे पोळे होताहेत दुर्मिळ

Published on

मधाचे पोळे होताहेत दुर्मिळ
जव्हारमधील शेतकऱ्यांच्या उत्पनात घट

जव्हार, ता. ४ (बातमीदार) : निसर्गसौंदर्याने बहरलेल्या जव्हारच्या जंगलव्याप्त भागात आयुर्वेदिक औषधे, जाळी-मुळी, फळे, वेली, कंदमुळे हा रानमेवा मोठ्या प्रमाणात मिळतो; मात्र या भागात हिवाळ्यांत अगदी सहज उपलब्ध होणारे बहुगुणकारी मधाचे पोळे हे दुर्मिळ होऊ लागले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पनात घट होत आहे.
जव्हारच्या ग्रामीण भागात हिवाळ्याच्या दिवसात सहज उपलब्ध होणारे व गुणकारी औषध म्हणून ओळखले जाणारे मधाचे पोळे (मोहोळ) आता शेतासह झाडाझुडपांतून दुर्मिळ होत आहे. एकेकाळी शेतशिवारात मोठ्या प्रमाणात आढळणारे माधाचे पोळे दिसेनासे झाल्याने निसर्गप्रेमी, शेतकरी तसेच मधविक्री करणाऱ्या मजुरांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मोफत मिळणारे हे गुणकारी औषध आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
मोहोळ हा मधमाश्यांनी तयार केलेला एक नैसर्गिक गुलकंद असून, तो लहान मुलांसाठी उपयोगी मानला जातो. ग्रामीण भागात याचा वापर औषध म्हणून केला जात असे; मात्र अलीकडील काळात रब्बी हंगामातील फुलोऱ्याची पिके मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने मधमाश्यांना आवश्यक अन्न मिळत नाहीत. परिणामी, मधमाश्यांचे थवे कमी होत असून, मोहोळ तयार होण्याचे प्रमाणही घटले आहे. पूर्वी शेताच्या कडेला, झाडाझुडपांत, लिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात मोहोळ आढळत असे; मात्र बदलत्या शेती पद्धती, तणनाशके, विविध रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर व फुलझाडांची घट याचा थेट परिणाम मोहोळाच्या अस्तित्वावर होत असल्याचे जाणकार सांगतात.

उत्पन्नाचे साधन घटले
जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी मोहोळ हे हिवाळ्यातील उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत होते. सकाळी लवकर शेतात जाऊन मोहोळ शोधणे, ते गोळा करून बाजारात विकणे, असा काहींचा दिनक्रम असे. मधाच्या मोहोळाची किंमत त्याच्या आकारावर अवलंबून असे. विशेषतः लिंबाच्या झाडावरील मोहोळाचे मध लहान मुलांसाठी गुणकारी औषध म्हणून ओळखले जात असल्याने त्याला अधिक मागणी आहे; मात्र सध्या मोहोळाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचे साधन बंद पडत आहे.

पूर्वी मधमाश्यांचे थवे मोठ्या प्रमाणात नजरेस पडायचे; मात्र शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, याकरिता बेसुमार रासायनिक खतांचा वापर, विविध फवारण्या यामुळे मधाची पोळी दुर्मिळ होऊ लागली आहेत.
- रवींद्र गवते, शेतकरी

फोटो - 266, 267

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com