जाहिरनाम्याविना प्रचाराचा धडाका
वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे; मात्र अद्याप एकाही प्रमुख राजकीय पक्षाने आपला अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात, तसेच मतदारांमध्येही प्रचाराच्या चर्चांना उधाण आले आहे.
१५ जानेवारीला महापालिकेसाठी मतदान होणार असून १३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता प्रचार बंद होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आल्यानंतर यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अवघे नऊ दिवस मिळाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक वेळेच्या कमतरतेत आणि तीव्र राजकीय स्पर्धेत पार पडणार आहे. आज रविवार (ता. ४) असल्याने प्रचार सुरू होताच सर्वच पक्षांकडून पदयात्रा, घराघरांत भेटी, कोपर सभा, समाजमाध्यमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे; मात्र प्रभागातील उमेदवाराने, तसेच पक्षाने अद्याप जाहीरनामे जाहीर न झाल्याने विकासाचे ठोस मुद्दे, आर्थिक नियोजन आणि आगामी पाच वर्षांचा रोडमॅप मतदारांसमोर मांडला गेलेला नाही. शहरातील वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, सांडपाणी व स्वच्छता, आरोग्यसेवा, शिक्षण व्यवस्था, झोपडपट्टी पुनर्वसन, घरपट्टी व करप्रणाली, तसेच स्मार्ट सिटीशी संबंधित अपूर्ण प्रकल्प याबाबत पक्षांची अधिकृत भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णत: बदललेली दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे स्वबळावर निवडणूक लढवत थेट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची शिवयुती तयार झाली असून, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांची स्वतंत्र आघाडी, तर राष्ट्रवादी अजित पवार गटांचा ‘एकला चलो’ करत मैदानात उतरली आहे. त्यामुळे आता मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असून, मतविभाजनाचा मोठा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रील्समध्येच धन्यता
जाहीरनाम्याऐवजी सध्या समाजमाध्यमांवरील रील्समध्येच धन्यता मानली जात आहे, तर प्रचारात आरोप-प्रत्यारोप, विरोधकांच्या अपयशावर टीका यांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. राजकीय पक्षांकडून जाहीरनामा उशिरा जाहीर झाल्यास तो मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.
चुरशीची निवडणूक
जाहीरनाम्याविना सुरू झालेला प्रचार, कमी कालावधी, बदललेली राजकीय समीकरणे आणि बहुकोनी लढत यामुळे नवी मुंबई महापालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत जाहीरनामे जाहीर होतात की नाही आणि ते मतदारांवर किती प्रभाव टाकतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे व मनसे यांच्या शिवयुतीचा जाहीरनामा हा येत्या एक ते दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- प्रवीण म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

