मुंबई–गोवा महामार्ग चौपदरीकरणात कोलाड आंबेवाडीवर अन्याय
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कोलाड आंबेवाडीवर अन्याय
अंडरपाससाठी आज साखळी उपोषण
रोहा, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात लोणेरे, नागोठणे, महाड आणि पेण येथे अंडरपास देण्यात आले असताना कोलाड-आंबेवाडी परिसराला मात्र डावलण्यात आल्याचा आरोप करीत विविध संघटनांनी सोमवारी (ता. ५) आंबेवाडी नाका येथे साखळी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन देण्यात आले आहे.
या आंदोलनात रोहा तालुक्यातील आंबेवाडी, वरसगाव, कोलाड व पंचक्रोशीतील नागरिकांसह व्यापारी संघटना, टेम्पो, इकोव्हॅन व रिक्षा संघटना सहभागी होणार आहेत. कोलाड आंबेवाडी येथे दोन अंडरपास देण्यात यावेत, दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोडचे रखडलेले काम पूर्ण करावे, तसेच गटारांवर झाकणे बसवावीत, या प्रमुख मागण्या आहेत.
एनएचएआयमार्फत पळस्पे ते इंदापूर या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या १५ वर्षांपासून सुरू असून या प्रक्रियेत अनेक नागरिकांच्या जागा, घरे व जमिनी बाधित झाल्या आहेत; मात्र काम सुरू करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता, जनसुनावणी न घेता आणि ग्रामपंचायतीमध्ये रस्त्याचे ड्रॉइंग न दाखवता काम सुरू केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
एक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, ज्येष्ठ नागरिक सभागृह, सार्वजनिक गणेश मंडळ, आठवडा बाजार व स्मशानभूमी यांसारख्या अत्यावश्यक व लोकोपयोगी सुविधा आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे वास्तव संघटनांनी मांडले आहे.
आजपर्यंत एनएचएआयकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे नमूद करीत या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट
आंबेवाडी येथे दोन अंडरपासची गरज
आंबेवाडी परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांना वारंवार महामार्ग ओलांडावा लागतो. अपघातांचा धोका लक्षात घेता रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर दोन्ही बाजूंना दोन अंडरपास देणे अत्यावश्यक असून, ही एकच मागणी पूर्ण न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

