पालिका म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’ ठरू नये…

पालिका म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’ ठरू नये…

Published on

पालिका म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’ ठरू नये
डोंबिवलीतील शाळेच्या बसवरून परखड जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः महापालिका म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’ असल्याप्रमाणे काही नगरसेवक वागत असल्याचे म्हणत, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे डोळे उघडणारी परखड जनजागृती डोंबिवलीतील विद्यानिकेतन शिक्षण संस्थेने केली आहे. संस्थेच्या शाळेच्या बसवर झळकविण्यात आलेल्या फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांमध्येही यावर चर्चा रंगू लागली आहे.
एकदा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर पालिकेचे आपणच वतनदार, सरंजामदार असल्याच्या थाटात काही लोकप्रतिनिधी वावरतात. त्यामुळे आपण कोणाला नगरसेवक म्हणून निवडतो, यावर शहराचे भवितव्य अवलंबून आहे, असा स्पष्ट संदेश या फलकांमधून देण्यात आला आहे. मागील २५ ते ३० वर्षांत निवडून दिलेल्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी नेमके कोणते दिवे लावले, याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे, अन्यथा कल्याण-डोंबिवली शहर उकीरड्यात बदलण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विद्यानिकेतन शिक्षण संस्थेने ‘जागल्याची भूमिका’ घेत शाळेच्या बसवरून सामाजिक, नागरी आणि स्थानिक प्रश्नांवर जनजागृती केली आहे. वाहतूक कोंडी, वाढत्या नागरी समस्या, रस्ते रुंदीकरण न करता करण्यात येणारे सिमेंट काँक्रीटीकरण, त्यामुळे होत असलेली रस्त्यांची धुळधाण, सत्तेसाठी सुरू असलेली हालचाल आणि नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर उडवला जाणारा गुलाल ही परिस्थिती कोणी निर्माण केली, असा सवाल फलकांवरील मार्मिक शब्दांत उपस्थित करण्यात आला आहे. पूर्वी चाळीत राहणारे, सॅंडल-स्लीपरमध्ये फिरणारे काही नगरसेवक आज कोट्यवधींच्या गाड्या, हवेल्या आणि जमिनींचे मालक कसे झाले, हा प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या तुटपुंज्या मानधनातून ही संपत्ती कशी जमली, असा थेट सवाल नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे.

उमेदवारीसाठी ओक्साबोक्सी रडणे
उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी ओक्साबोक्सी रडणे, काहींना भोवळ येणे, तर काहींना हुंदके आवरणे कठीण जाणे एवढा समाजसेवेचा उमाळा होता, तर गेल्या ३० वर्षांत शहर स्मार्ट, आखीव-रेखीव का झाले नाही, असा थेट प्रश्नही विचारण्यात आला आहे. समाजसेवेच्या नावाखाली पक्ष बदलून निष्ठा विकणाऱ्यांनी शहर विकासाचा कोणता ठोस अजेंडा राबविला, याचाही जाब फलकांमधून मागण्यात आला आहे.


ही शेवटची संधी
शहर खरोखर सुधारायचे असेल, तर ही शेवटची संधी समजून मतदानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी ‘सुधारण्याची’ गरज आहे. आता मतपेटीतून सफाई मोहीम हाती घ्या आणि शहराचे भवितव्य उज्ज्वल करा, असे आवाहन विद्यानिकेतन शिक्षण संस्थेने या फलकांच्या माध्यमातून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com