रविवारी मतांचा जोगवा

रविवारी मतांचा जोगवा

Published on

रविवारी मतांचा जोगवा
वसईत उमेदवार, कार्यकर्त्यांची प्रभागांमध्ये धावपळ
वसई, ता. ४ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत विजयश्रीची माळ गळ्यात पडावी, यासाठी उमेदवारांची शर्यत सुरू झाली आहे. अशातच सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवारांनी वेळ साधली.
वसई-विरार शहर महापालिकेत २९ प्रभाग आहेत. महायुती, बहुजन विकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, अजितदादा पवार राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह अपक्ष असे ५४७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अशातच प्रचारासाठी वेळ कमी असल्याने प्रभागाची व्याप्ती अधिक आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधत चौक बैठका, सभा तसेच घरोघरी प्रचार करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. या वेळी प्रचारादरम्यान बँजो, हाती झेंडे, निवडणुकीचे चिन्ह घेऊन प्रत्येक प्रभागातून कार्यकर्त्यांचा फौजफाटा उतरवण्यात आला आहे. वसई-विरार शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे व अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. तिकीट मिळाले नसल्याने अनेक अपक्ष उभे राहत नशीब अजमावणार आहेत. तर बविआने मनसे, काँग्रेस युतीसमोर महायुती घटक पक्षाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जाणार असल्या तरी मतदारराजा कोणाला कौल देणार, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
--------------
मुद्दे चर्चेचा विषय
ः- प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण किती सरस आहोत, हे सांगण्यासाठी स्पर्धा, चढाओढ सुरू झाली आहे. नागरिकांना सद्यःस्थितीत भेडसावणाऱ्या समस्या, भविष्यातील योजना, विकासाची कामे, नवे प्रकल्प यांची माहिती प्रचारामधून दिला जात आहे.
- भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना यांसह राष्ट्रवादी अजितदादा पवार, मनसे, काँग्रेसचे वरिष्ठ नेतेमंडळी उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वसई- विरार शहरात दाखल होणार असून प्रचारात कोणकोणते मुद्दे मांडले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
--------------------------
चिमुकला प्रचारक आकर्षणाचे केंद्र
रविवारी निघालेल्या प्रचार रॅलीत सायकलवरील चिमुकला अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले जात होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून चिमुकलेदेखील महापालिकेच्या निवडणुकीत उतरल्याचे चित्र होते.
------------------
देवदर्शनाची लगबग
आपला विजय व्हावा, अशी इच्छा प्रत्येक उमेदवाराला आहे. त्यामुळे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी अनेकजणांनी मंदिराकडे पावले वळली असल्याचे दिसून येत आहे. देवदेवतांचे दर्शन, मनोभावे पूजा करून प्रभागात प्रचाराची सुरुवात करण्यात येऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com