उरणमध्ये कचरा व्यवस्थापन कोलमडले
उरणमध्ये कचरा व्यवस्थापन कोलमडले
घनकचरा प्रकल्प कार्यान्वित नसल्याने ग्रामपंचायत हद्दीत गंभीर स्थिती
उरण, ता. ४ (वार्ताहर) : तालुक्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप पूर्णतः कार्यान्वित न झाल्याने विविध ग्रामपंचायत हद्दींमध्ये कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. गावोगावी रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये तसेच वस्तीच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्वच्छता व पर्यावरणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून दररोज घरगुती तसेच व्यापारी स्वरूपातील कचरा संकलित केला जातो; मात्र हा कचरा शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि कार्यरत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने तो तात्पुरत्या ठिकाणी टाकण्यात येत आहे. यामुळे कचऱ्याचे ढीग वाढत असून डास, उंदीर यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः काही भागांत कचऱ्यामुळे नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डेंगी, मलेरिया, विषमज्वर, ताप यांसारख्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना बसत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे; मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला असून त्याचा त्रास थेट ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत स्तरावर मर्यादित कर्मचारी आणि अपुरी साधनसामग्री असल्याने कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे अशक्य झाले आहे. काही ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे वायुप्रदूषण वाढत आहे. याचा परिणाम परिसरातील पर्यावरणासह नागरिकांच्या श्वसनसंस्थेवरही होत आहे.
....................
प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन
सिडको परिसरातील ग्रामपंचायतींचा कचरा सिडको हद्दीत आणून टाकला जातो आणि तेथून सिडकोमार्फत कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात येते. तसेच जेएनपीए परिसरातील ग्रामपंचायतींचा कचरा जेएनपीए वसाहतीजवळील कचरा प्रकल्पात टाकण्यात येतो; मात्र ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींना कचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रकल्प रखडला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उरण गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी सांगितले, की कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

