२९५ रणरागिणी मैदानात

२९५ रणरागिणी मैदानात

Published on

हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का...’ निवडणूक प्रचाराला दिल्या जाणाऱ्या या हाकेचे रूपांतरण प्रत्यक्ष मतांमध्ये करण्यासाठी सर्वच पक्षांनी यंदा मोठ्या प्रमाणात महिला कार्ड खेळले आहे. नगरसेवक पदांसाठी ५० टक्के महिला आरक्षण लागू असले, तरी सर्वसाधारण गटातही अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आले आहे. परिणामी, ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६४१ उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या २९५च्या घरात पोहचली आहे. सत्तेच्या गणितात महिला उमेदवार आणि मतदार किंगमेकरची भूमिका बजावणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण बदलले आहे. सत्तेच्या सारिपाटामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे स्थानिक संस्थांमध्ये रणरागिणींचा आवाज भक्कम झाला आहे. ठाणे महापालिकाही त्यासाठी अपवाद नाही. किंबहुना, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३१पैकी तब्बल ७० महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. आरक्षणानुसार ६६ जागा महिलांसाठी राखीव होत्या. पुरुषांपेक्षा जास्त जागांवर महिलांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे ६७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेतही ३६ नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपच्या १२, राष्ट्रवादीच्या २०, काँग्रेसच्या दोन नगरसेविकांचा समावेश होता. महापौरपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर पालिकेच्या सभागृहात खऱ्या अर्थाने महिलाराज अनुभवायला मिळाले. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ नगरसेवक पदांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामध्ये ६६ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुमारे ६४१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सहा नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये चार महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयाचे खाते महिला उमेदवारांनी उघडले आहे. एकूण उमेदवारांमध्ये महिलांची संख्या यावेळीही लक्षणीय असल्याचे दिसते. आरक्षित जागांवर बहुतेक सर्वच पक्षांनी आपले महिला उमेदवार दिले आहेत. पण सर्वसाधारण गटातही महिला कार्ड खेळल्याचे दिसत आहे. दुसरीकडे एमआयएम, बसप, सप, वंचित या पक्षासह अपक्ष महिला उमेदवारांची संख्याही यावेळी लक्षणीय आहे. शंभरच्या घरात महिला उमेदवार सर्वच प्रभागांमध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत महिलांचाच बोलबाला दिसत आहे.

दिग्गजांचा समावेश
शिवसेना शिंदे गटाने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना पुन्हा संधी दिली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांच्यासह शिवसेना सचिव, माजी नगरसेवक यांच्या पत्नींचाही समावेश आहे. बहुतेक माजी नगरसेविकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतवले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानेही माजी नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांच्या पत्नींना संधी दिली आहे. शिवसेना ठाकरे गट मात्र या सर्व सारिपाठात वेगळा ठरला आहे. नंदिनी विचारे, महेश्वरी तरे या नावांचा अपवाद वगळता सर्वाधिक नवीन चेहऱ्यांना रणभूमीत उतरवले आहे. त्यामुळे दिग्गजांमुळे वर्षानुवर्षे निवडणूक लढवण्याची संधी हुकलेल्या सामान्य महिलांनाही यावेळी आपली ताकद दाखवता येणार आहे. परिणामी, जुने जाणते विरुद्ध नवीन चेहरे असा हा सामना रंगणार आहे.

एक नजर
- २०२६च्या पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार पाच जागा महिला अनुसूचित जातीसाठी, दोन जागा महिला अनुसूचित जमातीसाठी, १८ जागा महिला मागासवर्ग प्रवर्गासाठी, तर ४१ जागा महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्या होत्या.
- २०१७ मध्ये १३१पैकी ७० महिला नगरसेविका निवडून आल्या. शिवसेनेच्या ६७ पैकी ३६, भाजपच्या २३ पैकी १२, राष्ट्रवादीच्या ३४ पैकी २० तर काँग्रेसच्या तीन पैकी दोन महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या.
- २०२६च्या निवडणुकीत मिळालेल्या माहितीवरून शिवसेना शिंदे गटाने ८७ पैकी ४१ महिला उमेदवार दिले आहेत. भाजपने ४० पैकी २१, राष्ट्रवादी अजित पवार गटाने ६६ पैकी ३३, राष्ट्रवादी शरद पवार गटाने ६४ पैकी २३, काँग्रेसने -६४ पैकी २९, शिवसेना ठाकरे गटाने ५३ पैकी ३३, तर मनसेने २३ पैकी १६ महिला उमेदवार दिले आहेत. इतर पक्षांसह अपक्ष उमेदवार ९९ आहेत.
- बहुतेक जागांवर महिलांविरोधात महिला उमेदवार देण्याची खेळी पक्षांनी केली आहे.
- यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या जागांसह इतर आरक्षित जागांवर आणि सर्वसाधारण गटातही महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

‘ती’ ठरणार किंगमेकर
निवडणुकीत १६ लाख ४९ हजार ८६७ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये आठ लाख ६३ हजार ८७४ पुरुष, तर सात लाख ८५ हजार ८३० महिला मतदारांची संख्या आहे. प्रत्येक प्रभागातील चारपैकी दोन पॅनलमध्ये महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवताना किंवा विजय गाठण्यासाठी महिला मतदार निर्णायक भूमिका बजावणार असून, त्या किंगमेकर ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com