भाजप-शिंदे सेनेत ‘मैत्रीपूर्ण’ लढतीचा दावा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत युती झाली असून, मित्र पक्षाला जागा सोडण्यासाठी दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी आपल्या इच्छेवर पाणी सोडले आहे. मात्र, केवळ एका पॅनेलमध्ये ही युती होऊ शकली नसून येथे मैत्रीपूर्ण लढत होताना दिसत आहे. पॅनेल २९मध्ये शिंदे सेना विरुद्ध भाजप असे चित्र आहे. अंबरनाथ पॅटर्न डोंबिवलीमध्ये राबवून तेथे कमळ फुलवण्यात येईल, असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीच्या २० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता उरलेल्या जागेवर विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पॅनेल २९मध्ये मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. येथे भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवारच एकमेकांविरोधात रिंगणात उतरले असून येथील विजय आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. याविषयी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाग २९ मध्ये युतीत मैत्रीपूर्ण लढत आहे; मात्र भाजप आपली पूर्ण ताकद लावणार आहे. पॅनेलमधील आयरे गावचा भाग सोडला, तर बाकी ठिकाणी पूर्ण ठिकाणी चिखल झाला आहे. या चिखलात आता कमळ फुलवण्याची वेळ आली आहे. येथे १०० टक्के अंबरनाथ पॅटर्न राबवून कमळ फुलवले जाईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाकडे शिवसेनेला दिलेला थेट इशारा म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग २९ मधील ही ‘मैत्रीपूर्ण’ म्हणवली जाणारी लढत प्रत्यक्षात किती रंगतदार ठरणार, याकडे आता संपूर्ण कल्याण-डोंबिवलीचे लक्ष लागले आहे.
घराणेशाहीवर टीका
डोंबिवलीतील आयरे गावात भाजपचे माजी नगरसेवक व विद्यमान उमेदवार मंदार टावरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी नंदू परब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उद्घाटनानंतर झालेल्या शक्तिप्रदर्शनात टावरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर घराणेशाहीचा आरोप करत थेट टीका केली. राजकारणात वारसाहक्क नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कष्टाला महत्त्व मिळाले पाहिजे, असे म्हणत त्यांनी मतदारांमध्ये भाजपचा मुद्दा ठळकपणे मांडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

