नववर्षात ‘कर्तव्यकेंद्री विकास’
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ५ : कर भरायचे नाहीत; पण सुविधा हव्यात. स्वच्छता ठेवायची नाही; पण शहर सुंदर हवे. पाणी वाचवायचे नाही; पण टंचाईवर तक्रार करायची, ही मानसिकता बदलल्याशिवाय शहराचा खरा विकास शक्य नाही. याच वास्तवाकडे बोट दाखवत नववर्ष २०२६ मध्ये ‘कर्तव्यकेंद्री विकास’ हा नवा विचार रुजवण्याचा ठाम संकल्प उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी आपले मूलभूत कर्तव्य ओळखले, स्वीकारले आणि पाळले, तरच उल्हासनगरला खरी विकासदिशा मिळेल, असा स्पष्ट संदेश या नववर्षी प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
उल्हासनगर शहराच्या विकासासाठी केवळ योजना, निधी किंवा प्रशासन पुरेसे नसून, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि कर्तव्यभावना सर्वांत महत्त्वाची आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत उल्हासनगर महापालिकेने २०२६ या वर्षात नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्याचा निर्धार केला आहे. उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्पष्ट केले की, कर भरणे हे प्रशासनावर उपकार नसून शहराच्या विकासात नागरिकांचे योगदान आहे. वेळेवर आणि प्रामाणिक करभरणा झाला, तर रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येतात. करचुकवेगिरीमुळे थेट शहराच्या विकासाला खीळ बसते, हे नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. नागरिक कर्तव्यशील झाले, तर उल्हासनगरचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल, असा विश्वास व्यक्त करत आयुक्त आव्हाळे यांनी नववर्ष २०२६ मध्ये प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे विकासाची नवी वाटचाल सुरू करावी, असा संदेश दिला.
प्रत्येकाची जबाबदारी
स्वच्छतेचा प्रश्न केवळ महापालिकेचा नसून प्रत्येक घराचा आहे. ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, रस्ते व नाले स्वच्छ ठेवणे या छोट्या सवयी मोठा बदल घडवू शकतात. स्वच्छ शहर म्हणजे केवळ देखणे शहर नव्हे, तर आरोग्यदायी आणि सन्मानाने जगण्यास योग्य शहर असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
पाण्यासाठी ठाम भूमिका
पाण्याच्या बाबतीतही आयुक्तांनी ठाम भूमिका मांडली आहे. पाण्याची चोरी, बेकायदा नळजोड आणि अपव्यय यामुळे संपूर्ण शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणी वाचवणे आणि पाण्याचा गैरवापर थांबवणे हे केवळ नियमपालन नसून पुढील पिढ्यांप्रती आपली जबाबदारी आहे, असा संदेश देण्यात आला आहे.
त्रिसूत्री उपक्रमाचे संकेत
वाहतूक नियम, बांधकाम परवाने, महापालिकेचे आदेश यांचे पालन केल्यास प्रशासन आणि नागरिकांमधील संघर्ष कमी होऊन सुशासनाचा मार्ग सुकर होतो. २०२६ मध्ये “हक्क मागण्याआधी कर्तव्य पाळूया” हा विचार शहरभर सातत्याने अधोरेखित केला जाणार आहे. शाळा, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जागृती, सहभाग आणि सातत्य या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम राबवण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.
प्रशासन ही केवळ यंत्रणा नसून कर्तव्याची जाणीव असलेली सेवा आहे, ही भावना कायम ठेवूनच काम करत आहोत. डीप क्लीनिंग, ई-कार्यालये, आरटीएस ऑनलाइन, तक्रार निवारण यंत्रणा, डॅशबोर्ड, डिजिटल शिक्षण, स्मार्ट शाळा, आदर्श उद्यान, आयडब्ल्यूएमएस, स्मार्ट शौचालय आणि पायाभूत दुरुस्ती यांसारखे उपक्रम शहराच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवत आहेत. या प्रयत्नांचे प्रतिबिंब आगामी काळात स्पष्टपणे दिसेल. १०० दिवसांचा कार्यक्रम पुरस्कार, स्वच्छ सर्वेक्षण मधील मानांकन आणि पीएमएवायसारखे नवीन प्रकल्प उल्हासनगरला विकासाची नवी ओळख देतील, असा विश्वास आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

