हमरापूर-गालतरे रस्त्याची दुरवस्था
हमरापूर-गालतरे रस्त्याची दुरवस्था
भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांची नाराजी
मनोर, ता. ५ (बातमीदार) : गोवर्धन इको व्हिलेजमुळे वाडा तालुक्यातील गालतरे गाव प्रकाशझोतात आले असले तरी येथील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. हमरापूर-गालतरे या साडेसात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची चाळण झाली असून या खड्डेमय रस्त्यावरूनच पर्यटक आणि भाविकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी पर्यटक, नागरिक यांच्याकडून केली जात आहे.
इस्कॉन संस्थेने उभारलेल्या गोवर्धन इको व्हिलेजमुळे गालतरे गाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जात आहे. सुमारे शंभर एकर क्षेत्रात वसलेल्या इको व्हिलेजला दररोज पाच हजारांहून अधिक भाविक भेट देतात. तर शनिवार-रविवारी भाविकांची संख्या दहा हजारांपर्यंत पोहोचते. मंत्री, विदेशी पाहुणे तसेच देशभरातील भाविक येथे नियमितपणे येत असतात. याशिवाय नाणे-सांगे ते गोऱ्हे गावादरम्यान मोठ्या प्रमाणावर फार्महाउस उभे राहिले आहेत. त्यामुळे येथे विकेंड साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. नाणे-सांगे, गालतरे, गुहीर आणि हमरापूर गावांतील ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासासाठी याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो; मात्र या सर्वांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. खड्डे असलेल्या रस्त्यावरून शेतीसाठी लागणारे साहित्य, शेतमालाची वाहतूक करणे खर्चिक ठरत आहे.
त्यामुळे हमरापूर-गालतरे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी भाविक, पर्यटक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हमरापूर-गालतरे रस्त्यावरील सहाशे मीटर लांबीच्या रस्त्याच्या डागडुजीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती शाखा अभियंता शरद बोडके यांनी दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या डागडुजीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गोवर्धन इको व्हिलेजमध्ये येणारे भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी हमरापूर-गालतरे रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे.
- लोकेश जैन, ग्रामस्थ, नाणे गाव
फोटो - 383
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

