म्हसा यात्रेत पारंपरिक गृहोपयोगी वस्तूंना मागणी;

म्हसा यात्रेत पारंपरिक गृहोपयोगी वस्तूंना मागणी;

Published on

म्हसा यात्रेत गृहोपयोगी वस्तूंना मागणी
घोंगडी, टोपली, बैल बाजारासह लाखोंची उलाढाल
टोकावडे, ता. ५ (बातमीदार) ः म्हसा येथील खांबलिंगेश्वर (म्हसोबा) यात्रेला शनिवार (३ जानेवारी) पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या दोन दिवसांतच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान आदी राज्यांतून भाविक या यात्रेला हजेरी लावत आहेत.
एकेकाळी प्रामुख्याने शेतकऱ्यांची यात्रा म्हणून ओळख असलेली म्हसा यात्रा आता चाकरमानी व नागरीकांनाही आकर्षित करत आहे. देवदर्शनाबरोबरच येथे मिळणाऱ्या पारंपरिक व गृहोपयोगी वस्तूंमुळे यात्रेची लोकप्रियता वाढली आहे. घोंगडी, कांबळ्या, टोपल्या, बैल बाजार, भांडी, प्रसिद्ध मिठाई यांसह विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीमुळे यात्रेत लाखोंची उलाढाल होत आहे.
आधुनिकतेच्या युगातही पाटा-वरवंटा, उखळी-मुसळ, पोलपट-लाटणे, बांबूपासून बनवलेले सूप, धान्य मोजण्यासाठीची पायली, विळा, कोयता, लोखंडी पंजा, नांगरासाठी फाळ अशी अनेक पारंपरिक व शेतीसाठी उपयुक्त साधने येथे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासह शहरी ग्राहकही या वस्तू खरेदीसाठी खास यात्रेत येत आहेत. तसेच मनोरंजनासाठी आकाशपाळणे, ‘मौत का कुआ’, जादूचे खेळ आदींमुळे अबालवृध्दांची रेलचेल दिसून येत आहे. पूर्वी महिनाभर चालणारी ही यात्रा आता दळणवळणाच्या सुविधांमुळे सुमारे पंधरा दिवस चालत असून दररोज लाखो भाविक उपस्थित राहत आहेत.

घोंगडीची परंपरा कायम
म्हसा यात्रेची ओळख असलेली घोंगडी आजही ग्राहकांची पसंती मिळवत आहे. पूर्वी पावसापासून संरक्षणासाठी वापरली जाणारी घोंगडी कालबाह्य होत असली, तरी काळ्या-पांढऱ्या व रंगीबेरंगी घोंगड्या व कांबळ्यांना मोठी मागणी आहे. काही ग्राहक या घोंगड्यांवर हातमागाची शिलाई करून घेण्यासाठी वेगळे पैसे मोजताना दिसतात.

पाळीव प्राण्यांच्या संरक्षणसाठी पट्टा
सध्या राज्यामध्ये बिबट्याचे प्रमाण वाढत आहे. बिबट्यापासून बकरी, गाय, कुत्रा यासारख्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण होण्यासाठी मानेला खिळे असलेला संरक्षणासाठी बनवलेला पट्टा म्हसा यात्रेमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

लाकडी उखळी व मुसळाला मागणी
लाकडी उखळी व मुसळ यासारख्या कालबाह्य होत चाललेल्या पारंपरिक साधनांनाही यात्रेत विशेष मागणी आहे. कर्जत तालुक्यातील कोतवालवाडी येथील आदिवासी कारागीर लहू कामडी यांनी उंबराच्या लाकडापासून तयार केलेल्या उखळ्या (१,३०० ते २,२०० रुपये) व शिसवाच्या लाकडापासून बनवलेले मुसळ (सुमारे ५०० रुपये) विक्रीसाठी ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com