नाताळ, सलग सुट्ट्यांचा ठाणे परिवहनाला फटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : नाताळ सण आणि वर्षअखेरीस आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक ठाणेकरांनी पर्यटनासाठी किंवा गावी जाण्याला प्राधान्य दिले. त्याचा फटका ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेला बसला असून (टीएमटी) प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली. याचा थेट परिणाम परिवहन सेवेच्या उत्पन्नावर झाला असून, २५ ते ३० डिसेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १० लाख रुपयांची घट नोंदवली गेली आहे.
मागील महिन्यात २५ डिसेंबरला नाताळ सणाची सुट्टी होती. त्यानंतर शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने नागरिक बाहेरगावी गेले होते. परिणामी, या कालावधीत टीएमटी बस सेवेला अपेक्षेपेक्षा कमी प्रवासी मिळाले. सामान्य दिवसांत टीएमटीचे दैनंदिन उत्पन्न साधारण २६ ते २७ लाखांच्या आसपास असते. मात्र, सुट्ट्यांच्या या कालावधीत उत्पन्नात चढ-उतार दिसून आला. २४ डिसेंबरला टीएमटीचे उत्पन्न २७ लाख ७४ हजार ९४४ रुपये होते. नाताळच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला हे उत्पन्न घटून २२ लाख २७ हजार ९३० रुपये झाले. २६ डिसेंबरला २६ लाख ४३ हजार ८३५, २७ डिसेंबरला २४ लाख ९० हजार ६७८, तर २८ डिसेंबरला आणखी घट होऊन २० लाख ३९ हजार ४५४ रुपये इतके उत्पन्न मिळाले. २९ डिसेंबरला उत्पन्न वाढून २७ लाख ४७ हजार २०६ झाले असले, तरी ३० डिसेंबरला पुन्हा घट होऊन ते २६ लाख ७४ हजार ७७० रुपयांवर आले. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात; तसेच सणासुदीच्या काळात शाळांना सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे गावी जाणे, पर्यटनाला जाणे किंवा घरीच राहणे पसंत करतात. त्यामुळे नियमित प्रवाशांची संख्या कमी झाली होती. त्याचा फटका परिवहन सेवेला सहन करावा लागला.
दरम्यान, सण व सुट्ट्यांच्या कालावधीत विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवासी संख्या घटते. याचा परिणाम ठाणे ते बोरिवलीसारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गांवरील बस सेवेवर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे.
सणासुदीतही हीच परिस्थिती
यापूर्वी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीतही प्रवासी संख्येत घट झाल्याने दररोज साधारण तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले होते. परिणामी, त्या काळात सुमारे ४० लाख रुपयांचे उत्पन्न कमी झाले होते. दिवाळी सणाच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
उत्पन्नात चढ-उतार
तारीख उत्पन्न (रुपये)
२४ डिसेंबर २७,७४,९४४
२५ (नाताळ) २२,२७,९३०
२६ डिसेंबर २६,४३,८३५
२७ डिसेंबर २४,९०,६७८
२८ डिसेंबर २०,३९,४५४
२९ डिसेंबर २७,४७,२०६
३० डिसेंबर २६,७४,७७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

