आयुष्मान कार्ड निर्मितीला गती
आयुष्मान कार्डनिर्मितीला गती
३७ टक्के उद्दिष्ट साध्य; नऊ कोटी ३० लाखांचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राज्यात राबवण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण नऊ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन कोटी ४४ लाख कार्डची निर्मिती पूर्ण झाली आहे. यानुसार राज्यात सध्या सुमारे ३७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून, उर्वरित ६३ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. दरम्यान, २०२६ या नवीन वर्षात किमान ८० ते ९० टक्के कार्डवाटप करण्याचे लक्ष्य सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येतात. हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, अपघात उपचारांसह हजारहून अधिक उपचार पॅकेजेसचा समावेश असल्यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना या योजनेतून दिलासा मिळाला आहे. सध्या कार्डधारकांची संख्या एकूण पात्र लोकसंख्येच्या एक तृतीयांशहून अधिक असल्याचे चित्र आहे.
विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरीब भागात आयुष्मान कार्डमुळे कॅशलेस उपचारांची उपलब्धता वाढली असून वैयक्तिक आरोग्य खर्चात लक्षणीय घट झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्येही या कार्डच्या आधारे उपचार शक्य होत असल्याने नागरिकांचा सहभाग वाढत आहे.
राज्यातील आयुष्मान कार्डनिर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास, आरोग्य सेवांतील असमानता कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व परवडणारी उपचार व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष नोंदणी मोहिमा, आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायत स्तरावरील कार्डनिर्मिती, तसेच शहरी भागात मोबाईल युनिट्सद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.
नवीन मानधन दर
कार्ड तयार करताना प्रत्येक केवायसीसाठी पाच रुपये दिले जात होते. आता दर वाढवून २० रुपये दिले जात आहेत. तर, कार्ड वितरणासाठी तीन रुपयांवरून १० रुपये दर करण्यात आला आहे. असे यात एकूण मानधन आता प्रत्येकी ३० रुपये करण्यात आले आहेत.
जनजागृतीचा अभाव
आजही या योजनांच्या कार्डशी संबंधित जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. अनेकदा उपचारांची गरज पडल्यानंतर नागरिक या कार्डसाठी धावाधाव करतात. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतल्यास योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.
फोटो - 418
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

