लवकरच दिघा येथील माता-बाल रुग्णालय सेवेत

लवकरच दिघा येथील माता-बाल रुग्णालय सेवेत

Published on

लवकरच दिघा येथील माता-बाल रुग्णालय सेवेत
नवी मुंबई महापालिका प्रशासनाची माहिती; स्‍थानिकांना आरोग्य सेवेचा दिलासा
वाशी, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या दिघा विभागातील नागरिकांसाठी नव्या वर्षात महत्त्वाची आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. दिघा परिसरातील पालिकेच्या ओएस-वन भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या ५० खाटांच्या माता-बाल रुग्णालयाची इमारत पूर्णपणे उभी राहिली असून सध्या अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात हे रुग्णालय कार्यान्वित होईल, असा विश्वास पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दिघा परिसर हा नवी मुंबईतील सर्वाधिक झोपडपट्टी असलेला भाग म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर येथे मध्यमवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मोठी वस्ती आहे. आजपर्यंत या भागातील गर्भवती महिलांना उपचार व प्रसूतीसाठी ऐरोली येथील माता-बाल रुग्णालय किंवा वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात जावे लागत होते. खासगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ऐरोली रुग्णालय हे दिघ्यापासून लांब असल्यामुळे, विशेषतः प्रसूतीसारख्या तातडीच्या प्रसंगी महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे. दिघ्यातून ऐरोली येथे पोहोचण्यासाठी प्रथम ठाणे-बेलापूर मार्गावर जावे लागते आणि त्यानंतर रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागतो. या प्रक्रियेत वेळेचा तसेच पैशांचा अपव्यय होत होता. अनेक वेळा उशीर झाल्याने माता आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. दिघा परिसराची वाढती लोकसंख्या आणि येथील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन, याच भागात स्वतंत्र माता-बाल रुग्णालय उभारावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. मात्र, जागेअभावी हा प्रकल्प रखडला होता. अखेर महापालिकेच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीकडून ओएस-वन भूखंड उपलब्ध झाल्याने रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला.
..............
रुग्णांसाठी रस्‍त्‍याचे बांधकाम पूर्ण
दिघा विभागातील साठे नगर परिसरातून या रुग्णालयाकडे जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ताही बांधण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णवाहिका तसेच नागरिकांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. रुग्णालय सुरू झाल्यानंतर दिघा परिसरातील गर्भवती महिला, माता आणि नवजात बालकांना वेळेवर आणि सुलभ आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com