गावगावात भावनिक स्पर्शासह शहरात हायटेक प्रचार
गावगावात भावनिक स्पर्शासह शहरात हायटेक प्रचार
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन प्रवाहांची चर्चा
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : निवडणूक रणधुमाळीला वेग येत असताना प्रचाराच्या पद्धतींमधील ठळक तफावत स्पष्टपणे समोर येत आहे. एकीकडे गावठाण व झोपडपट्टी भागात आपुलकी आणि थेट संवादावर आधारित प्रचार सुरू असताना, दुसरीकडे शहरी भागात हायटेक, दिखाऊ प्रचाराचा प्रभाव दिसून येत आहे.
गावागावांत उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. हातमिळवणी, कुटुंबीयांची चौकशी, स्थानिक प्रश्नांवर चर्चा आणि जुन्या नात्यांची उजळणी या माध्यमांतून प्रचार केला जात आहे. चहाच्या टपरीवर बसून चर्चा, छोट्या गटांमध्ये संवाद, महिलांशी व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत उमेदवार आपुलकीचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलाच माणूस, ही भावना येथे प्रचाराची खरी ताकद ठरत आहे. विशेषतः झोपडपट्टी आणि गावठाण भागात मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशा प्रश्नांवर केंद्रित चर्चा होत असून मतदारही आपली मते मोकळेपणाने मांडत आहेत. प्रचार साधा असला तरी भावनिक नाते जपणारा आणि विश्वासार्ह असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. मात्र शहरी भागात प्रचाराचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. भव्य मंडप, मोठे बॅनर-पोस्टर्स, वाहनांच्या ताफ्यांतून फेऱ्या, ढोल-ताशांचा गजर, सोशल मीडियावरील जाहिराती आणि पैशाच्या जोरावर जमवलेली गर्दी यावर अधिक भर दिला जात आहे. सभांना उपस्थित राहण्यासाठी आर्थिक आमिष किंवा व्यवस्थेचा वापर होत असल्याची उघड चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
.......................
झगमगाटात थेट संवाद कमी
या झगमगाटात उमेदवार आणि मतदार यांच्यातील थेट संवाद मात्र कमी होत असल्याची भावना अनेक सुजाण मतदार व्यक्त करत आहेत. प्रचार भव्य असला तरी त्यात आपुलकीचा अभाव जाणवत असल्याचे मत मांडले जात आहे. आता मतदानाला काहीच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. आपुलकीचा, विश्वासाचा प्रचार मतांमध्ये रूपांतरित होणार की पैशाच्या बळावर उभी केलेली गर्दी निकाल ठरवणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन प्रचार पद्धतींची खरी ताकद आगामी निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

