‘लाडक्या बहिणी’ निवडणूक रिंगणात

‘लाडक्या बहिणी’ निवडणूक रिंगणात

Published on

वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ७ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत आहे. ५० टक्के आरक्षण असल्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून तब्बल १०८ महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. सर्वाधिक महिला उमेदवारांना भाजपने संधी दिली असून, त्यापाठोपाठ शेतकरी कामगार पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा क्रमांक लागतो. या महिला उमेदवारांपैकी कोण ‘संधीचे सोने’ करणार, हे चित्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी पुरुष उमेदवारांप्रमाणेच महिला उमेदवारांनीही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आपल्या प्रभागांमध्ये जोरदार तयारी केली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तसेच पशुधन यांच्यासाठी सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, छोटेखानी सभा, मेळावे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला. प्रभागातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, मुलांच्या शाळांमधील प्रवेश, नोकरीच्या संधी, तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून अनेक महिला इच्छुकांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये महिला उमेदवारांचे मजबूत नेटवर्क तयार झाले होते.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महिला उमेदवारांसह त्यांचे पती, वडील, भाऊ व कुटुंबीय यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला. आपल्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास पर्यायी राजकीय व्यवस्था तयार ठेवत, विविध पक्षांच्या मुलाखतींना उपस्थिती लावण्यात आली. काही महिलांना त्यांच्या मूळ पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तर काहींना राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी इतर पक्षांनी संधी दिली आहे.

महापालिका निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला सक्षमीकरणाचे चित्र दाखवणारा मानला जात आहे. आता या १०८ ‘लाडक्या बहिणींपैकी’ कोण मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लाडकी होणार का महापौर?
पनवेलच्या राजकारणामध्ये वर चष्मा राहिलेले म्हात्रे व ठाकूर कुटुंबीयापैकी पुरुष उमेदवार महानगरपालिकेमध्ये कोणीही निवडणूक लढवत नाही. प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी व आमदार विक्रांत पाटील यांची बहीण निवडून आल्यामुळे याही वेळी पनवेल महापालिकेला महिला महापौर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

पक्षनिहाय महिला उमेदवारांची संख्या
भाजप : ४०
शेतकरी कामगार पक्ष : १६
अपक्ष : १५
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : १०
वंचित बहुजन आघाडी : १०
काँग्रेस : ५
अन्य :१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com