व्यसनमुक्त तरुण पिढीचा संकल्प
मुरबाड, ता. ७ (वार्ताहर) : राष्ट्रीय युवक दिनानिमित्त शिवळे येथील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये मंगळवारी (ता. ६) तालुका विधी सेवा समिती, मुरबाड यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता आणि तरुण पिढीला व्यसनमुक्त व सकारात्मक जीवनमार्गाकडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सध्याच्या काळात तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. अमली पदार्थ, कोकेन, गांजा यांसारख्या घातक पदार्थांमुळे होणारे सामाजिक व शारीरिक दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. म्हात्रे यांनी केले. यावेळी मुरबाड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष आर. पोतदार आणि माजी अध्यक्ष ॲड. एस. एस. झुंजारराव यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) गोविंद एस. वरपे यांनी भूषविले. तरुणांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता आपली ऊर्जा अभ्यास, चारित्र्यनिर्मिती आणि समाजहितासाठी वापरावी, असे सांगताना त्यांनी जीवनरूपी बोटीचे सुंदर उदाहरण दिले. समुद्रात चालणाऱ्या बोटीमध्ये पाणी शिरले, तर ती बुडते; तसेच जीवनात षड्रिपू शिरले, तर माणसाचे आयुष्य भरकटते, असा मार्मिक संदेश त्यांनी दिला.
सूत्रसंचालन सतीश हिंदुराव यांनी केले. कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समितीचे ॲड. सचिन चौधरी, ॲड. सचिन वाकचौडे, न्यायालयीन कर्मचारी राजेश बांगर, संस्थेचे सहसचिव भास्कर हरड, प्राचार्य मनोहर इसामे, उपप्राचार्य बी. एम. पवार, उपमुख्याध्यापक शरदचंद्र सोनवणे, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, कबीरांचे दोहे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या आचरणातील विचारांचे दाखले देत न्यायाधीश वरपे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जीवन कसे सार्थक करावे, मूल्यांशी कसे निष्ठावान राहावे आणि जबाबदार नागरिक म्हणून कसे घडावे, याबाबत त्यांनी समर्पक आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

