मतदारांसाठी डिजिटल लोकशाही''चा नवा पर्याय!
मतदार सुविधा आता एका क्लिकवर
उल्हासनगर महापालिकेचा राज्यात पहिला उपक्रम; ऑनलाइन पोर्टलचे लोकार्पण
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ७ : उल्हासनगर महापालिकाने मतदार सुविधा डिजिटल माध्यमातून एकाच व्यासपीठावर आणत राज्यात पहिल्यांदाच असा नावीन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक उपक्रम राबविला आहे. आगामी उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादी, उमेदवारांची माहिती आणि नकाशासह दिशा एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे ‘ऑनलाइन मतदार सुविधा’ पोर्टल सुरू केले आहे. या अभिनव उपक्रमामुळे उल्हासनगर महापालिका डिजिटल निवडणूक व्यवस्थापनात राज्यात आघाडीवर पोहोचली असून लोकशाही अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात मंगळवारी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ‘ऑनलाइन मतदार सुविधा’ पोर्टलचा औपचारिक सुरुवात करण्यात आली. मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना, जलद व अचूक माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तिडके, पोलिस उपायुक्त सचिन गोरे, उपायुक्त (निवडणूक) विशाखा मोटघरे, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, गणेश शिंपी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘एक क्लिक’वर मतदानाची संपूर्ण माहिती
या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा अचूक पत्ता व तेथे पोहोचण्यासाठी जीपीएस नकाशा, मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक व वैयक्तिक तपशील, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे, तसेच प्रभागांची रचना सहजपणे पाहता येणार आहे. या सुविधेमुळे मतदारांना प्रत्यक्ष ‘व्होटर स्लिप’वर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
राज्यातील पहिली महापालिका
मतदारांसाठी इतक्या सर्वसमावेशक आणि तंत्रस्नेही स्वरूपात डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणारी उल्हासनगर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, गैरसमज दूर होतील आणि मतदानाचा उत्साह अधिक वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
संकेतस्थळावर निवडणूकसंबंधी सर्व माहिती
महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.umc.gov.in निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये-
वैध नामनिर्देशन पत्रे व माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी
प्रभागनिहाय अंतिम व पुरवणी मतदार यादी
निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश
प्रारूप व अंतिम प्रभागरचना व सुधारित अधिसूचना यांचा समावेश आहे
मतदारांना आवाहन
मतदारांनी https://umc.localbody.org, https://umcvotersearch.com आणि https://www.umc.gov.in या लिंकचा वापर करून या सुविधेचा लाभ घ्यावा व लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही अधिक सुलभ, पारदर्शक आणि मतदारकेंद्रित करण्याच्या दृष्टीने उल्हासनगर महापालिकेने हे महत्त्वाचे डिजिटल पाऊल उचलले आहे. मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादी आणि उमेदवारांची माहिती एका क्लिकवर मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवणे आणि कोणतीही गैरसोय होऊ न देणे, हीच आमची भूमिका आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

