शिवसेना-कलानी-साई युतीत फूट उघड
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ६ : निवडणूकपूर्व युतीचा गाजावाजा, मंचावर दोस्तीचे फोटो आणि भाषणांत एकजुटीचे आश्वासन; मात्र प्रत्यक्ष निवडणूक मैदानात चित्र मात्र पूर्णपणे वेगळे दिसू लागले आहे. ‘दोस्ती का गठबंधन’ म्हणत जाहीर करण्यात आलेली शिंदेंची शिवसेना, कलानी गट आणि साई पक्षाची युती उल्हासनगरात प्रभाग पातळीवरच कोलमडताना दिसत आहे. दोन प्रभागांत युतीतील पक्षांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने युतीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), कलानी गट आणि साई पक्ष यांनी एकत्र येत ‘दोस्ती का गठबंधन’ जाहीर केले होते. भाजपला बाजूला ठेवत जागा वाटपाचे सूत्र ठरवण्यात आले आणि शहरभर युतीचा प्रचार सुरू करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी अर्जांच्या टप्प्यावरच या युतीतील अंतर्गत विसंगती समोर आल्या. शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ९ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढणारे कलानी गटाचे उमेदवार आणि दूरदर्शन संच चिन्हावर लढणारे साई पक्षाचे उमेदवार एकाच प्रभागात रिंगणात उतरल्याने ‘युती नेमकी आहे तरी कुणाची?’ असा प्रश्न मतदार विचारू लागले आहेत. एकीकडे युतीचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे त्याच युतीतील पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात मत मागताना दिसत असल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे.
समन्वयाचा अभाव
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने उभे ठाकले असले, तरी यावेळी शिवसेनेला गेल्या निवडणुकीत भाजपसोबत असलेले साई पक्ष आणि कलानी गट यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे लढत वेगळी आणि अधिक रंगतदार ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र युतीतील समन्वयाच्या अभावामुळे ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
स्वबळावर लढण्याचा निर्णय
२०१९ पासून कलानी गट शिवसेनेसोबत आहे. लोकसभा निवडणुकीतही हा पाठिंबा कायम होता. महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान ‘दोस्ती का गठबंधन’ पुन्हा जाहीर करण्यात आले. शिवसेनेनेही ही युती मान्य करत कलानी गटाला बळ दिले. त्यानंतर जीवन इदनानी यांच्या साई पक्षालाही या युतीत स्थान देण्यात आले. तीन पक्षांनी मिळून निवडणुकीची रणनीती आखली; मात्र जागावाटप, अंतर्गत विरोध आणि समन्वयाचा अभाव यामुळे भाजपने युतीपासून अंतर राखले आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
उमेदवारांची खेळी
कलानी गट आणि साई पक्षाने शिवसेनेसह जागावाटप निश्चित करून उमेदवार जाहीर केले. मात्र, याच प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला. युती असूनही दोन प्रभागांत युतीतील पक्षांचे उमेदवार अर्ज भरून मैदानात उतरले. अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यावर हे उमेदवार माघार घेतील, अशी अपेक्षा होती; मात्र तसे घडले नाही.
मतदार गोंधळात
एकीकडे युतीचे बॅनर, पोस्टर्स आणि सभा सुरू असताना दुसरीकडे त्याच युतीतील पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात मत मागत असल्याने मतदार गोंधळात सापडला आहे. त्यामुळे ‘दोस्ती का गठबंधन’ ही केवळ घोषणा ठरते की प्रत्यक्षात तुटक, विस्कळित आणि विसंवादी युती आहे, याचा निर्णय मतदारच मतदानातून देणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
इथे समन्वयाचा अभाव ठळक
१) प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर कलानी गटाकडून लढणाऱ्या कविता लासी यांनी आपले नामनिर्देशन मागे घेतले नाही, अशी चर्चा आहे. याच प्रभागात साई पक्षाकडून माजी महापौर आशा जीवन इदनानी रिंगणात आहेत.
२) प्रभाग क्रमांक ५ क मध्ये कलानी गटाकडून सीमा कलानी, तर साई पक्षाकडून जयश्री थावानी मैदानात आहेत.
३) प्रभाग ५ ड मध्ये साई पक्षाचे निष्ठावंत सुनील गंगवानी आणि शिवसेनेचे हरजिंदरसिंह भुल्लर हे दोघेही निवडणूक लढवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

