चिकू प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

चिकू प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

Published on

चिकू प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

वाणगाव, ता. ७ (बातमीदार) : कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान शास्त्रज्ञ रुपाली देशमुख यांच्या हस्ते साई समर्थ महिला गटाच्या चिकू प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी चिकू हे डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध पीक असल्याने त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास, त्यातून स्थानिक महिलांना आर्थिक रोजगार उपलब्ध होईल असे सांगितले. तसेच चिकू पावडर, त्यासह चिकूचे लोणचे, चिप्स, वडी, बर्फी, कुल्फी, सुकवलेला चिकू आदी प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे महिला गटांनी गुणवत्तेवर भर देऊन आपल्या वस्तूची स्वतःची ओळख निर्माण करत, थेट विक्रीकडे वाटचाल करावी, असे त्या पुढे म्हणाल्या. या कार्यक्रमास अध्यक्ष वैशाली मंडळ, सचिव जयश्री इभाड, सदस्या वैशाली इभाड, संगीता इभाड, परिसरातील महिला बचत गट सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ व उमेदचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र रस्त्याची मागणी

कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू-कासा राज्य मार्गावर गंजाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असून रुग्णालयात जाण्यासाठी येथे स्वतंत्र व सुरक्षित रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गंजाड येथून वडोदरा महामार्ग देखील जात असून, त्या दिशेने प्रवेश करताना चढ-उताराचा मार्ग असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच येथील सेवा रस्त्याचे काम ही सुरू असल्याने येथे येणाऱ्या खेड्या-पाड्यातील असंख्य आदिवासी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे गरोदर महिला, वृद्ध नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
-----------------------------------------------
मेडिकल स्टोअर्स असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : विक्रमगड तालुका मेडिकल स्टोअर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत असोसिएशन सदस्यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भानुशाली होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असोसिएशनच्या कामकाजाचा आढावा घेतला. संघटनेची नोंदणी, औषध दुकानांच्या इन्स्पेक्शन संदर्भातील समस्या, नवीन कार्यकारिणी निवड, तसेच औषध विक्रेत्यांच्या अडचणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात असोसिएशनचे उपाध्यक्ष साईनाथ पाटील, सचिव विजय पाटील, सहसचिव सागर बिन्नर, खजिनदार दिनेश बांगर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
------------------------------------------------
वसईत पत्रकार दिन उत्साहात संपन्न

विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई येथील समाज मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार केदारनाथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना पत्रकारितेचे महत्त्व समजावून सांगितले. आजचा काळ, हा कसोटीचा काळ असून या काळात पत्रकारांनी सजग राहायला हवे. जगात आणि देशात काय चालले आहे. त्यावर बारीक लक्ष ठेऊन समाजाला न्याय देण्याचे काम करायला पाहिजे. दर्पणकारांनी याकरिताच वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. दर्पणकरांनी त्याकाळी लोकांच्या समस्या मांडण्यासाठी मराठीतून वृत्तपत्र काढले. परंतु त्याच वृत्तपत्रात त्यांनी एक पान हे इंग्रजीत ठेवले, कारण लोकांच्या समस्या या अधिकाऱ्यांना समजाव्यात हा, त्या मागचा उद्देश होता असे पाटील यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन नितीन म्हात्रे, अवयव दानाचे प्रणेते पुरुषोत्तम पाटील पवार, सोमवंशी क्षत्रिय समाज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, समाज मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक केवळ वर्तक आणि निवृत्त माहिती अधिकारी निरंजन राऊत, सागर वाघ उपस्थित होते.

--------------------------------------------------
डहाणूत ''विद्यार्थी जनजागृती''

बोर्ड ता. ७ (बातमीदार) : डहाणू येथील तालुका विधी सेवा समिती, डहाणू बार असोसिएशन आणि ज्ञानभारती संचलित करंदीकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष विद्यार्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ''युवा दिना''चे औचित्य साधून ''डीएडब्ल्यूएम'' योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदा, तणावमुक्ती आणि समाजमाध्यमाच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डहाणू न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेल्या डहाणूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांनी आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करताना तरुणांनी कोणती कायदेशीर खबरदारी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com