पाच वर्षांचे आश्वासन...

पाच वर्षांचे आश्वासन...

Published on

आश्वासनांची पूर्ती अन्यथा पुन्हा उमेदवारी नाही
डोंबिवलीकरांचा उमेदवारांना थेट सवाल

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ ः महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस सुरू असतो. रस्ते, पाणी, कचरा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक प्रश्नांवर मोठमोठी भाषणे होत असतात. मात्र, निवडणूक संपल्यानंतर ही आश्वासने कागदावरच राहतात, अशी मतदारांची ठाम भावना आहे. याच पार्श्वभूमीवर आता बोचरा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यास परत निवडणूक लढणार नाही. हे सर्व उमेदवार जाहीरपणे लिहून देतील का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी हे फलक लावत उमेदवारांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.
मतदारांकडे मत मागायला येताना अनेक आश्वासन सत्ताधारी देतात. निवडणुका लागल्या की त्यांना मतदार दिसतात. मात्र, इतर वेळी प्रभागातील समस्या मात्र दिसत नाहीत. कल्याण-डोंबिवली अनेक समस्यांनी गेले वर्षानुवर्षे त्रासली आहे. यावरून आता पंडित यांनी लावलेले फलक हे मतदार आणि उमेदवार या दोघांचे डोळे उघडणारे आहेत. या फलकावरून मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक अर्जासोबतच आपल्या वॉर्डसाठी नेमके काय करणार, याचा स्पष्ट संकल्पनामा जाहीर करावा. केवळ सर्वसाधारण आश्वासनांऐवजी पाच वर्षांत कोणती कामे पूर्ण करणार, त्यांची प्राधान्यक्रमानुसार यादी द्यावी, अशी मागणी होत आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जबाबदारीची हमी. उमेदवारांनी जाहीर केलेल्या संकल्पनांची पूर्तता पाच वर्षांत झाली नाही, तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असे लेखी स्वरूपात घोषित करावे, अशी थेट मागणी होत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर अशा प्रकारचा जाहीरनामा प्रत्यक्षात आला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फक्त पक्ष नव्हे, तर कामगिरी हाच निकष ठरेल. मात्र, उमेदवार आणि पक्ष यासाठी तयार आहेत का, हा खरा प्रश्न आहे.

पारदर्शकता असावी
वॉर्डमध्ये कोणतेही विकासकाम सुरू करण्यापूर्वी त्या कामाची संपूर्ण माहिती, खर्च, कालावधी, ठेकेदार, कामाचा उद्देश ही नागरिकांसमोर मांडली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘काम सुरू झालंय’ इतकी माहिती नव्हे, तर काम कशासाठी आणि कसे होत आहे, हे नागरिकांना समजले पाहिजे, अशी भूमिका पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com