अमली पदार्थाच्या प्रादुर्भावाविरोधात ‘डाॅन’ची जनजागृती
अमली पदार्थाच्या प्रादुर्भावाविरोधात ‘डाॅन’ची जनजागृती
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे ५ ते १२ जानेवारीदरम्यान विशेष उपक्रम
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे व्यापक जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने मंगळवारी (ता. ६) रायगड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा व नियोजन बैठक पार पडली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ५ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘डॉन’ योजना (ड्रग अवेअरनेस अँड वेलनेस फॉर अ ड्रग फ्री इंडिया) अंतर्गत विशेष ड्रग्जविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान युवक-केंद्रित उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार असून, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ड्रग्जविरोधी प्रतिज्ञा कार्यक्रम, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे, पोस्टर व बॅनर प्रदर्शन, पथनाट्य तसेच थेट जनसंवाद उपक्रमांचा समावेश आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत, त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या पिढीमध्ये अमली पदार्थांचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंताजनक बाब असून, वेळेत प्रभावी जनजागृती करणे, पोलिस यंत्रणेमार्फत सातत्याने आढावा घेणे आणि कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करणे तितकेच आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीळकंठ यांनी सांगितले की, ड्रग्जविरोधातील लढा यशस्वी करायचा असेल, तर सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने एकत्र काम करणे गरजेचे आहे. ड्रग्जचा वाढता प्रसार ही गंभीर सामाजिक समस्या असून, सामूहिक प्रयत्नांतूनच त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विधि स्वयंसेवक (पीएलव्ही), पोलिस प्रशासन, शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांचे सहकार्य घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या ड्रग्जविरोधी जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
...................
चौकट :
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अवेअरनेस कार्यक्रम, पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, व्याख्याने तसेच संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून अमली पदार्थांचे दुष्परिणाम, संबंधित कायदे व प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

