प्रचाराची भिस्त ‘वडापाव’वर!
वाशी, ता. ७ (बातमीदार) : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामुळे नवी मुंबई शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रस्त्यांवरील खाद्यविक्रेत्यांचे दिवस चांगलेच फुलले आहेत. विशेषतः वडापाव, समोसा, पॅटिस आणि चहा हे पदार्थ प्रचार पथकांचे ‘लाइफलाइन’ ठरत आहेत. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर आणि तुर्भे परिसरातील वडापाव विक्रेत्यांकडे नेहमीच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी विक्री वाढल्याचे चित्र आहे.
गल्लोगल्ली प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसह घरोघरी, चौकाचौकात प्रचार करताना दिसत आहेत; मात्र प्रचारासाठी कार्यकर्ते जितके महत्त्वाचे, तितकेच महत्त्व त्यांच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी प्रचार फेऱ्या सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स येतात. एका वेळेला ५० ते १०० वडापाव, समोसे किंवा चहाच्या ऑर्डर्स दिल्या जात असल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. प्रचाराच्या दिवसात बसायला वेळ मिळत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हात सतत चालू असतो, असे घणसोली येथील वडापाव विक्रेते अमोल माने यांनी सांगितले.
निवडणूक प्रचार म्हटले, की मोठे बॅनर, पोस्टर्स, वाहनफेऱ्या आणि जाहिरातींचा खर्च लगेच डोळ्यांसमोर येतो; मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर दिवसभर घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचा खर्च हाही प्रचार बजेटचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. दिवसभर चालणाऱ्या पदयात्रा, बैठका आणि प्रचार फेऱ्यांमध्ये वडापाव हाच सर्वाधिक खर्चाचा घटक बनल्याचे दिसून येत आहे. एका दिवसातील हा खर्च किरकोळ वाटत असला, तरी संपूर्ण प्रचार काळात तो मोठ्या रकमेपर्यंत पोहोचतो.
बिर्याणी, पुलावलाही पसंती
रस्त्यावरील टपऱ्यांबरोबरच नवी मुंबईतील छोट्या हॉटेलांनाही प्रचाराचा फायदा होत आहे. प्रचार पथकांसाठी तयार जेवणाच्या मागणीमध्ये वाढ झाली असून बिर्याणी, पुलाव, भाजी-चपाती यांसारख्या पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणासोबतच शहरातील खाद्यव्यवसायालाही चांगलाच ‘बूस्ट’ मिळाल्याचे चित्र आहे.
रात्री उशिरापर्यंत टपऱ्या सुरू
प्रचारादरम्यान थोडी विश्रांती घेण्यासाठी गरम कटिंग चहा आणि झटपट खाणे हाच कार्यकर्त्यांचा आवडता पर्याय ठरत असल्याने अनेक टपऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. वाढत्या गर्दीमुळे काही विक्रेत्यांनी अतिरिक्त मदतनीसही ठेवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

