निवडणूक प्रचारामुळे हंगामी रोजगार
वाशी, ता. ७ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीला अवघे आठ दिवस उरल्याने नवी मुंबई शहरात सर्वत्र प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवनवीन कल्पना राबवत आहे. या प्रचारामुळे विविध क्षेत्रांतील कलाकार, तंत्रज्ज्ञ, सेवा पुरवठादार आणि नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यात फोटोग्राफर, गायक, निवेदक ते रिक्षा चालकांपर्यंत सर्वांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत चित्रपटाच्या लोकप्रिय चालींवर आधारित प्रचारगीतांचा ट्रेंड विशेषत्वाने दिसून येत आहे. पारंपरिक फलक, पत्रके आणि आता सभांबरोबरच संगीताच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रचारासाठी तयार करण्यात येणाऱ्या या गीतांमध्ये हिंदी व मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांच्या चाली वापरल्या जात आहेत. ‘आमचा नेता... लई पॉवरफुल’, ‘रग रग मैं है तुफान’, ‘सिंघम’ यांसारख्या गाण्यांच्या धर्तीवर उमेदवारांच्या प्रतिमेला साजेशी शब्दरचना करण्यात येते.
महिला उमेदवारांसाठी महिलांचा आवाज, तर पुरुष उमेदवारांसाठी पुरुषांचा आवाज देण्यात येत आहे. या वेळी उमेदवार स्वतः मतदारांशी संवाद साधत असल्याचे भासविले जात आहे. यामुळे प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचे राजकीय कार्यकर्त्यांचे मत आहे. ही गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, विकासाची आशा, बदलाची उमेद आणि कामाची प्रेरणा देणारा आशय असतो. अवघ्या एक ते दोन मिनिटांत प्रभागातील प्रमुख समस्या, सोडवण्यासाठीचे उपाय व भविष्यातील प्रकल्प यांचा उल्लेख गीतांमधून केला जातो. लक्षवेधी ओळी आणि साध्या भाषेतील संदेश यामुळे ही गाणी लवकरच मतदारांच्या ओठांवर रुळत आहेत.
फोटोग्राफर, व्हिडिओग्राफरना मागणी
निवडणूक प्रचारात सर्वाधिक मागणी फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरना आहे. उमेदवारांच्या सभा, घरभेटी, पदयात्रा, जाहीरनाम्याचे प्रकाशन, समाज माध्यमांसाठी रिल्स आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी व्यावसायिक फोटोग्राफरना मोठ्या प्रमाणात काम मिळत आहे. काही तरुणांनी याच संधीचा लाभ घेत अल्पकालीन रोजगारातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
वाहतूक क्षेत्राला चालना
प्रचारात वाहतूक क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. रिक्षाचालक, टेम्पोचालक, खासगी वाहनांचे चालक यांना प्रचारासाठी वाहनांची मागणी आहे. उमेदवारांच्या भेर्टीगाठी, कार्यकर्त्यांची ने-आण, प्रचार साहित्य वाहतुकीसाठी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे रोजंदारीवर दिवसाला हजार ते अडीच हजार, तर अनेक चालकांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

