अंबरनाथमध्ये भाजपशी जवळीक काँग्रेसला भोवली; प्रदीप पाटीलांसह १२ नगरसेवक निलंबित !
काँग्रेसचे १२ नगरसेवक निलंबित
अंबरनाथमध्ये भाजपशी जवळीक भोवली
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) ः नगरपालिकेच्या राजकारणात भाजपसोबत युती करणे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला चांगलेच महागात पडले आहे. पक्षाची परवानगी न घेता भाजपसोबत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मोठी कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह निवडून आलेल्या सर्व १२ नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तसेच अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ता समीकरणाची घडी विस्कटली आहे.
अंबरनाथ नगर परिषदेत काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत; मात्र निकालानंतर प्रदीप पाटील यांनी प्रदेश कार्यालयाला कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी संधान साधले. या तिन्ही पक्षांनी मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ची स्थापना केली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष मिळून ३१ नगरसेवकांचे संख्याबळ जमवण्यात आले. या आघाडीने अभिजित करंजुले यांची गटनेतेपदी निवड केल्याचे पत्रही नगर परिषद प्रशासनाला दिले आहे.
आमदारांची टीका
शिवसेनेकडे (शिंदे गट) २७ नगरसेवक आणि एका अपक्षाचे पाठबळ आहे. या राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. भाजप आणि काँग्रेसची ही युती ‘अभद्र’ असल्याची टीका त्यांनी केली होती. या सर्व प्रकरणाची प्रसारमाध्यमांतून दखल घेतली गेल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला.
पक्षशिस्तीचा भंग
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी यासंदर्भात निलंबनाचे पत्र जारी केले आहे. भाजपसोबत केलेले हे गटबंधन पक्षशिस्तीचा भंग करणारे आणि अत्यंत चुकीचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर अंबरनाथमधील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईमुळे आता अंबरनाथ नगर परिषदेतील सत्तेचे समीकरण कोणत्या वळणावर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खळबळजनक आरोप
अंबरनाथमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या निलंबनानंतर आता स्थानिक विरुद्ध प्रदेश नेतृत्व असा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेली कारवाई ही पूर्णतः एकतर्फी आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्याकडे पैशांची मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप निलंबित ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
पक्ष जिवंत ठेवला
प्रदीप पाटील यांनी आपली भूमिका मांडताना प्रदेश नेतृत्वावर प्रश्नांची सरबत्ती केली. ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार स्वबळावर निवडून येणे ही मोठी किमया आहे. निवडून आल्यावर प्रदेशाध्यक्षांनी साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूक काळात काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने किंवा स्टार प्रचारकाने अंबरनाथमध्ये सभा घेतली नाही. तरीही स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला, असे पाटील यांनी सांगितले.
पक्ष सोडण्याचा इशारा
निलंबनाच्या कारवाईवर बोलताना पाटील म्हणाले, की आम्ही काँग्रेस सोडून गेलेलो नाही, तर केवळ स्थानिक विकासासाठी ‘अंबरनाथ विकास आघाडी’ला पाठिंबा दिला होता; मात्र कोणताही संवाद न साधता किंवा कोणालाही विश्वासात न घेता ही कारवाई करण्यात आली आहे. जर पक्षाला निवडून आलेल्या नगरसेवकांची गरज नसेल, तर आम्हालाही अशा पक्षात राहण्यात कोणताही रस नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

