चेंबूरकरांची समस्यांतून सुटका कधी?

चेंबूरकरांची समस्यांतून सुटका कधी?

Published on

चेंबूरकरांची समस्यांतून सुटका कधी?
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः चेंबूर विधानसभा क्षेत्रातील घरांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन अनेकांनी निवडणूक लढविली, विजयही मिळविला. येथील झोपड्या असो किंवा वसाहती त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. येथे प्रदूषण आणि शौचालये, पाणीटंचाई, पदपथावर अतिक्रमण सुरू आहे. या प्रश्नावर रहिवासी वारंवार पाठपुरावा करीत आहेत; पण त्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. पालिका निवडणुकीच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागतील का, असा सवाल विचारला जात आहे.
सिद्धार्थ कॉलनी परिसरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे गाजर प्रत्येकवेळी दाखविले गेले. घाटला भागात एसआरए प्रकल्प रखडला आहे. येथील कोणती घरे पात्र, कोणती घरे अपात्र याचा गोंधळ मिटला नाही. लाल डोंगर परिसरात काही ठिकाणी पुनर्वसन झाले आहे, तर काही ठिकाणी प्रतीक्षा आहे. चेंबूर कॅम्प परिसरात असलेला ओल्ड बराक असो किंवा सिंधी वसाहतींच्या विकासाचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही. खारदेवनगरातही परिस्थिती अशीच आहे.
चेंबूरमध्ये प्रदूषण खूप वाढले आहे. अनेक बांधकाम करण्याच्या ठिकाणी योग्य नियमांचे पालन केले जात नाही. कधीकधी अचानक हवेत विषारी रसायनांचा वास येतो; पण तो वास कुठून येतो हे अजून कोणालाच माहीत नाही. तेल शुद्धीकरण कारखाने आणि आरसीएफ यांच्याकडून जबाबदारी झटकली जाते. तर चेंबूरमध्ये सार्वजनिक कचराकुंड्या खूपच कमी आहेत. त्यामुळे लोक रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात आणि परिसर अस्वच्छ दिसतो. त्‍यामुळे डास आणि रोगांची समस्या वाढत आहे. तसेच सार्वजनिक शौचालये फारच कमी असून अस्तित्वात असलेली शौचालये खराब अवस्थेत आहेत.
मुंबईसारख्या श्रीमंत शहरातही मूलभूत सुविधा नीट असणे गरजेचे आहे. चेंबूरसारख्या भागात शौचालयांची संख्या अपुरी आहे. काही ठिकाणी गटारांचे झाकण उघडे असते, त्यामुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो. लाल डोंगर, सिद्धार्थ कॉलनी आणि चेंबूर कॅम्प परिसरात पाण्याची समस्या आहे. सिंधी सोसायटी आणि इतर भागांत पाइपलाइन गळत आहेत. त्यामुळे पाणी वाया जाते. दुसरीकडे, सिद्धार्थ कॉलनी आणि झोपडपट्टी भागात पाण्याची कमतरता आहे. रस्ते आणि मेट्रोचे काम सतत सुरू असल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणे खूप कठीण झाले आहे.
पार्किंगची योग्य सोय नसल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना अडचण होते. चेंबूरमधील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे खराब आहेत. त्यामुळे रात्री अंधार असतो आणि महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडचण येते.

चेंबूरमध्ये पाण्याचा प्रश्न सतावत आहे. शौचालये, वाहतूक कोंडी सोडवण्याची केवळ आश्वासने दिली जातात; परंतु ते प्रश्न कोणीही सोडवत नाहीत. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने तरी याकडे लक्ष दिले पाहिजे.
- मनीष गांगुर्डे, रहिवासी

सर्व नागरी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. चेंबूरमध्ये वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. तसेच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात होणारी फलकबाजी रोखली पाहिजे, तसेच भ्रष्टाचाराला आळा बसायला हवा.
- हितेश रूपानी, रहिवासी

सिद्धार्थ कॉलनीवरील थकीत वीजबिलाचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. साचलेले पाणी आणि निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था, कॉलनीतील अनेक भागात वर्षभर पाणी साचलेले दिसून येते. सार्वजनिक शौचालयांच्‍या स्वच्छतेचा अभाव असून तुटलेल्या फरशा, निसरडे पृष्ठभाग आणि असुरक्षित रचना यामुळे ही शौचालये वापरणे धोकादायक बनली आहेत.
- मयूर बैले, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com