अंतर्गत नाराजी भाजपला भोवणार!

अंतर्गत नाराजी भाजपला भोवणार!

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बल १३ समर्थकांची उमेदवारी कापण्यात आल्याने मोठी नाराजी उफाळून आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आखलेल्या राजकीय खेळीमुळे ही तिकीट कापणी करण्यात आल्याची चर्चा असून, बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी ही बाब डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्याशी या प्रकरणी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

आमदार मंदा म्हात्रे यांचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजप संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय होते, मात्र उमेदवारी जाहीर करताना या समर्थकांना डावलण्यात आल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. काही ठिकाणी प्रचारापासून दूर राहण्याचा, तर काही ठिकाणी उघड नाराजी व्यक्त केली जात असल्याचे चित्र आहे. या अंतर्गत नाराजीचा थेट परिणाम बेलापूरमधील भाजप उमेदवारांच्या मतांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाराज कार्यकर्ते निष्क्रिय राहिल्यास किंवा मतदारांपर्यंत प्रभावी संदेश न पोहोचल्यास पक्षाची मते विभागली जाऊ शकतात. याच परिस्थितीचा फायदा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांना होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

इतकेच नव्हे, तर काँग्रेस, मनसे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारही या परिस्थितीचा लाभ घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपमधील अंतर्गत गोंधळ आणि नाराजीचा मुद्दा थेट मतदारांपर्यंत पोहोचवत विरोधक प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः प्रभागनिहाय लढतींमध्ये अल्प मताधिक्याने निकाल ठरणार असल्याने भाजपमधील मतविभाजन निर्णायक ठरू शकते. एकूणच, आमदार मंदा म्हात्रे समर्थकांची तिकीटे कापल्याने निर्माण झालेली नाराजी भाजपसाठी आव्हान ठरत असून, याचा लाभ विरोधकांना कितपत मिळतो, हे येणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

या नाराजांचा फटका बसणार
भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज पदाधिकारी दत्ता घंगाळे यांनी शिवसेना शिंदे गटाशी संपर्क करून त्यांनी सीवूड्समधून स्वतः आणि पत्नी अश्विनी यांच्याकरिता उमेदवारी मिळवली. घंगाळे दाम्पत्यामुळे भाजपला मिळणारी मते आता शिंदे गटाकडे वळणार आहेत. नेरुळ-जुईनगर परिसरातून भाजपच्या नाराज सुहासिनी नायडू यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. महेंद्र नाईक यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या नाराज उमेदवारांमुळे भाजपचे मत विभाजन होणार असल्याची शक्यता आहे.

मराठा समाज नाईकांवर नाराज
आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना उमेदवारी नाकारल्यामुळे मराठा समाजावर अन्याय केल्याची भावना बेलापूर मतदारसंघात निर्माण झाली आहे. आबा जगताप, मंगल घरत, पांडुरंग आमले आणि भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू तिकोने यांनाही उमेदवारी नाकारल्यामुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही तिकोने यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com