सेवा रस्त्याचा रुग्णसेवेला अडथळा
सेवा रस्त्याचा रुग्णसेवेला अडथळा
गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग धोक्यात
कासा, ता. ७ (बातमीदार) ः मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाचे डहाणू तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गावरील प्रस्तावित सेवा रस्ता थेट गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गावरून जाणार असल्याने आरोग्यसेवेपासून वंचित राहण्याची भीती स्थानिक व्यक्त करीत आहेत.
गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी असलेल्या मार्गावर द्रुतगती मार्गाचा सेवा रस्ता उभारण्यात येणार आहे. तांत्रिक रचनेनुसार सेवा रस्त्याची उंची सध्याच्या जमिनीच्या पातळीपेक्षा अधिक आहे. तसेच कामाच्या आराखड्यानुसार महामार्गाच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत उभारली जाणार असून, त्यामुळे आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडवला जाण्याची शक्यता आहे. तसेच परिसरात पर्यायी रस्ता देण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका किंवा रुग्णांचे आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, द्रुतगती मार्गाच्या कामात आरोग्य केंद्राच्या इमारतीचा काही भाग बाधित होत असल्याने आणि इमारत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषदेकडून येथे नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आली होती. पाच कोटींचा निधी मंजूर करून सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून २०२५ मध्ये तिचे लोकार्पण होऊन कामकाज सुरू झाले आहे; मात्र रस्त्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने नव्या इमारतीचा उपयोग होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
------------------------------------------
पर्यायी मार्ग गरजेचा
गंजाड तसेच परिसरातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणावर आदिवासी रुग्ण, गरोदर माता तसेच जिल्हा परिषद व आश्रमशाळांतील विद्यार्थी केंद्रावर अवलंबून आहेत. महामार्गाच्या विकासामुळे दळणवळण सुलभ होणार असले, तरी सार्वजनिक आरोग्यसेवेचा मार्गच बंद होत असल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्गाचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------------
मोलमजुरीवर पाणी
गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रावर गंजाड, रायतळी, आसवे, जामशेत, नवनाथ सोमनाथ, मणिपूर, देवगाव, गणेश बाग तर अनेक लहान पाडे जवळपास अवलंबून आहेत. गंजाड ग्रामपंचायतीची लोकसंख्या १२ हजाराच्या आसपास आहे. या ग्रामस्थांना १५ किलोमीटर अंतरावर आशागड आरोग्य केंद्र, नाहीतर १८ किलोमीटरवर कासा उपजिल्हा रुग्णालय किंवा १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या डहाणू येथील रुग्णालयांचा पर्याय आहे; पण यासाठी दिवसभराच्या मोलमजुरीवर पाणी सोडण्याची वेळ येणार असल्याचे संजय कामडी यांनी सांगितले.
----------------------------
प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणारा रस्ता द्रुतगती सेवा रस्त्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले जात आहे; मात्र अद्याप ठोस उपाय सुचवलेले नाहीत. दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने रस्ता बंद झाला तर रुग्णांचे मोठे हाल होतील.
- कौशल कामडी, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत गंजाड
़़़़़ः-------------------------------
आरोग्य केंद्रात जाणारा मार्ग द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्याने बाधित होत आहे. येथे सुरक्षा भिंत बांधली जाणार असून आरोग्य केंद्रासाठी जागा सोडण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीशी चर्चा सुरू आहे. आरोग्य केंद्रासाठी रस्त्याचे नियोजन करण्यात येईल.
- संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

