भाषणांना ब्रेक, शाखांना बूस्ट : ठाकरे बंधूंची स्ट्रॅटेजी

भाषणांना ब्रेक, शाखांना बूस्ट : ठाकरे बंधूंची स्ट्रॅटेजी

Published on

भाषणबाजीला फाटा; शाखाभेटींवर जोर
ठाकरे बंधूंचा महापालिकेसाठी फॉर्म्युला

विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः तब्बल १९ वर्षानंतर मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवत उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू पालिका निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण त्यांच्या संयुक्त सभांनी ढवळून निघेल, असा सर्वांचा होरा होता. मात्र, वेळेअभावी यावेळी ‘भाषण कमी, भेटी जास्त’ हे सूत्र दोन्ही पक्षांनी स्वीकारले आहे. त्यामुळे दोन्ही भावांची केवळ ११ जानेवारीला एकच संयुक्त सभा होणार आहे.
राज-उद्धव ही जोडगोळी आपल्या भाषणामुळे मैदान गाजवेल, अशी मुंबईकरांना अपेक्षा होती; मात्र मोठ्या सभा टाळून शिवसेना शाखा व प्रचार कार्यालयांना थेट भेटी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मुंबईतील २२७ शाखा या शिवसेनेच्या या शक्तिकेंद्रे मानली जातात. सामान्य मुंबईकरांच्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक याच शाखांमधून केली जाते. मुंबईतील सर्व २२७ शाखांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले असून राज आणि उद्धव यांनी या शाखा वाटून घेतल्या आहे. गेल्या दोन दिवसांपासून शाखा व प्रचार कार्यालय भेटींचे सत्र सुरू झाले आहे. उर्वरित शाखांना भेटी देण्याची जबाबदारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली असून काही शाखांना रश्मी ठाकरे भेट देणार असल्याचे कळते. वेळ कमी असल्यामुळे जास्तीत जास्त फिरणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
...
शाखा सक्रिय करण्यावर भर
मतदानासाठी अवघे दिवस शिल्लक असल्यामुळे प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची रणनीती यामागे आहे. शाखा किती मजबूत आहेत आणि त्या किती प्रभावीपणे काम करतात, यावर पक्षाच्या यशाची गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे थेट जनतेपर्यंत जाण्याऐवजी शाखा व कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे.
...
कार्यकर्त्यांची एकजूट
या निमित्ताने युवा व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी होत असून ठाकरे परिवारातील सदस्यांच्या वैयक्तिक भेटींचे महत्त्व शिवसैनिकांसाठी अनन्य साधारण आहे. दोन्ही भाऊ एकमेकांच्या प्रचार कार्यालयांना व शाखांना भेटी देत असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अधिक एकजुटीने कामाला लागले आहेत. दुसरे म्हणजे जाहीर सभांच्या आयोजनामध्ये वेळ, मनुष्यबळ, संसाधने खर्ची होतात. हे टाळून थेट कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा हा प्रयत्न आहे.
...
एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे अनुभवी आणि अनेकदा निवडून आलेले नगरसेवक पळवले आहेत. या धक्क्यातून सावरण्यासाठी शाखाशाखांना बळ देणे हा एकमेव मार्ग आहे.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
...
निवडणुकांदरम्यान चौकसभा, दारोदार प्रचार ही कार्यप्रणाली मुळात शिवसेनेने आणली. या भेटीतून कार्यकर्ते सक्रिय होतात, कामाला लागतात.
- संजय पाटील, शिवसेना अभ्यासक
...
फॉर्म्युला असा
- शाखांचे जाळे कार्यान्वित करणे
- शाखाभेटींतून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे
- दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन
- नगरसेवक फुटून गेल्याने शाखांवर विशेष भर
- मोठ्या सभांसाठीचा वेळ, मनुष्यबळ, संसाधने वाचवण्यावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com