ससून डॉक समस्यांच्या विळख्यात

ससून डॉक समस्यांच्या विळख्यात

Published on

ससून डॉक समस्यांच्या विळख्यात
कोट्यवधींची उलाढाल; मूलभूत सुविधांची वानवा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईसह सर्व देशाला मासळी पुरवणाऱ्या मुंबईच्या ऐतिहासिक ससून डॉकचे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. दररोज कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या ठिकाणी मच्छीमार, कोळी महिला आणि कामगारांकडे केवळ ‘मासळी उतरवणारे हात’ म्हणूनच पाहिले जाते. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट ससून डॉकमध्ये जात ‘सकाळ’ने समस्या जाणून घेतल्या.
ससून डॉकमधून दररोज पाचशेहून अधिक मासेमारी नौका समुद्रात जातात. आठ ते १० हजार मच्छीमार, हमाल, लिलाव करणारे, वाहतूक कामगार व सहाय्यक कर्मचारी या ठिकाणी काम करतात. याशिवाय ४०० ते ५०० कोळी महिला मासळीची छाटणी, लिलाव आणि विक्री प्रक्रियेत भाग घेतात. मात्र ससून डॉक परिसरात स्वच्छ पाण्याची अपुरी व्यवस्था, शौचालयांची कमतरता, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा आणि आपत्कालीन सुविधांचा अभाव कायम आहे. पावसाळ्यात चिखल, दुर्गंधी आणि रोगराईचा धोका वाढतो. लोकप्रतिनिधी मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मच्छीमार आणि कोळी महिलांनी केला आहे.

रस्त्यांची दयनीय अवस्था
ससून डॉक परिसरातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. तुटलेले काँक्रीट, साचणारे पाणी आणि कचरा यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. मासळी वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो आणि हातगाड्यांना मोठी कसरत करावी लागते. घसरून पडण्याच्या घटनांत कामगार जखमी होतात. वर्षभरच हीच परिस्थिती आहे.

कोळी महिलांच्या सुविधा दुर्लक्षित
ससून डॉकवरील मासळी व्यापार कोळी महिलांच्या श्रमावर उभा आहे. पहाटे अंधारात सुरू होणारे काम दुपारपर्यंत चालते. मात्र या महिलांसाठी बसण्याची सुरक्षित जागा, विश्रांतीची सुविधा किंवा स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. पुनर्विकास, सौंदर्यीकरण व पर्यटनाच्या नावाखाली मासळी बाजाराच्या जागा कमी होतील किंवा स्थलांतर होईल, अशी भीती महिलांमध्ये वाढत आहे.

आर्थिकदृष्‍ट्या महत्त्वाचा प्रभाग
ससून डॉक पालिकेच्या ‘ए’ प्रभागामध्ये येतो. हा प्रभाग आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी ससून डॉकसारख्या श्रमिकप्रधान भागाचे प्रश्न निवडणूक जाहीरनाम्‍यात दुय्यम राहतात. मतसंख्या मर्यादित व विखुरलेली असल्याचा फायदा राजकीय पक्ष घेत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. ससून डॉक म्हणजे केवळ व्यापार नाही; तो मुंबईच्या समुद्री परंपरेचा आणि कोळी संस्कृतीचा भाग आहे. तरीही स्वतंत्र ससून डॉक धोरण, दीर्घकालीन विकास आराखडा किंवा कोळी महिलांसाठी विशेष योजना आजवर अस्तित्वात नसल्याची टीका होत आहे.

कोळीबांधवांची मागणी
- डॉकचे आधुनिकीकरण, सुरक्षितता
- चांगले रस्ते व स्वच्छतेचे प्रश्न
- परप्रांतीय व्यापाऱ्यांमुळे वाढती स्पर्धा
- पर्यावरण नियमांचा थेट परिणाम

रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. केवळ आश्वासनांवर आम्ही भाळणार नाही. ससून डॉकच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ.
- जयेश भोईर, अध्यक्ष, मच्छीमार सरोदे सहकारी सोसायटी लि., कुलाबा

डॉकमधील रस्त्यांवर चालताना जीव मुठीत घ्यावा लागतो. पालिकेला सुरक्षित रस्तेही देता येत नाहीत.
- दर्शन मोहिते, कामगार ससून डॉक

आम्ही रोज मेहनत करतो. सुविधा मिळत नाहीत. आमच्या अडचणी पालिकेने समजून घ्याव्यात.
- अन्वर हुसेन, कामगार, ससून डॉक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com