ठाणे ही एकनाथ शिंदेंची ओळख म्हणून युती

ठाणे ही एकनाथ शिंदेंची ओळख म्हणून युती

Published on

ठाणे ही एकनाथ शिंदेंची ओळख म्हणून युती
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे हे पक्ष चालवित आहेत. त्यात ठाणे हे बाळासाहेबांचे विशेष प्रेम असलेले शहर आहे. शिंदे यांची राजकीय ओळख असलेले शहर आहे. त्यांच्या शहरात त्यांचे मन दुखावणे चुकीचे ठरले असते. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला, असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी युती बाबतच्या प्रश्नाचा उलघडा केला. ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष आज एक प्रमुख पक्ष आहे. ठाण्यामध्ये वर्षानुवर्षे शिवसेना मजबूतपणे लढलेली आहे. २५ वर्षांपासून शिवसेना हा ठाण्यातील प्रमुख राजकीय घटक पक्ष राहिला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांची ही भावना आमच्यासमोर मांडली होती. मात्र, या नव्या राजकीय परिस्थितीत आम्ही सर्वांनी मिळून एकत्र विचार केला. आजची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असून, तिचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेना ते चालवत आहेत, हे वास्तव आहे. अशा वेळी केवळ काही जागांच्या गणितासाठी वेगवेगळे लढलो असतो. तर कदाचित सत्ता मिळालीही असती. पण त्यातून कुठेतरी मनदुखावणी झाली असती, असे ते म्हणाले. ठाणे शहर हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत आवडते शहर होते. तिथे मित्रपक्षांमध्ये वादविवाद आणि संघर्ष होणे योग्य नव्हते.
म्हणूनच आम्ही ठरवले की, आवश्यकता पडली तर थोडी पडती बाजू घ्यायची, कमी जागा स्विकारायच्या. पण युतीतच लढायचे. मी आणि रवींद्र चव्हाण यांनी ही भूमिका आमच्या टीमसमोर मांडल्यानंतर सर्वांनी समजूतदारपणे त्याला मान्यता दिली. त्यामुळे आज आम्ही एकत्र लढत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय योग्य आहे. मुंबईमध्येही हा निर्णय बरोबर ठरला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत आम्ही एक मजबूत पक्ष झालो असतानाही, जागावाटपाच्या वेळी मागील निवडणुकीतील आकडेवारीमुळे काही अडचणी आल्या आणि कमी जागा घ्याव्या लागल्या. मात्र, रवींद्र चव्हाण हे स्वतः त्या भागातील असल्यामुळे त्यांनी सर्वांना समजावून सांगितले. आम्ही पुन्हा पडती बाजू घेतली. कारण शेवटी, पाच-दहा जागा जास्त मिळवण्यासाठी संपूर्ण एमएमआरमध्ये फूट पाडण्यापेक्षा, एकत्र येऊन लढणे अधिक महत्त्वाचे होते. याच भूमिकेतून आम्ही कल्याण-डोंबिवलीमध्येही एकत्र आलो.
………. …….
राज्यात एकच ब्रँड
महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव खरा ब्रँड होता. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कोणताही वैयक्तिक ब्रँड उरलेला नाही. मात्र, माझी आणि एकनाथ शिंदे यांची महायुती इतकी मजबूत आहे की कोणीही स्वतःला ब्रँड म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा बँड वाजविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com