घोषणांपेक्षा मैदानावरील विकास हवा
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ८ : ‘खड्ड्यांवर चालत स्वप्नं शोधणारी पिढी, मैदानांशिवाय वाढणारे खेळाडू आणि संधीअभावी शहर सोडणारे तरुण’ उल्हासनगरची आजची ओळख अशीच बनत चालली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. ‘हा विकास आहे का?’ असा थेट सवाल तरुण वर्ग विचारत आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण, खेळ, रोजगार प्रत्येक आघाडीवर अपयशाचीच पुनरावृत्ती होत असल्याची भावना तरुण पिढी व्यक्त करत आहे.
शहराचा विकास केवळ कागदावर आणि घोषणांपुरताच मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्षात उल्हासनगर मागे पडत चाललेले शहर बनत आहे. आज उल्हासनगरमधील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांच्या सापळ्यासारखी झाली आहे. सुरक्षित प्रवास ही केवळ कल्पनाच उरली आहे. तर दुसरीकडे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद झाला की संपूर्ण शहर तहानलेले राहते, ही बाब आजही सुटलेली नाही. शहरातील एकमेव स्विमिंग पूल कंत्राटदारांच्या ताब्यात दिल्याने सामान्य तरुणांसाठी तोही परवडणारा राहिलेला नाही. त्याचबरोबर मोठे उद्योग व नामांकित ब्रँड उल्हासनगर सोडून कल्याण, अंबरनाथ-बदलापूरकडे स्थलांतर करत असल्याने रोजगाराच्या संधीही कमी होत चालल्या आहेत. परिणामी, शिक्षण, नोकरी आणि मूलभूत सुविधांच्या शोधात अनेक नागरिकांना शहर सोडण्यास भाग पडत असल्याचे चित्र आहे.
डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून, पर्यावरण व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘तेच तेच चेहरे, तेच निष्फळ नेतृत्व’ यामुळेच उल्हासनगरचा विकास अपयशी ठरल्याची भावना तरुण वर्ग उघडपणे व्यक्त करत आहे. उल्हासनगरचा विकास केवळ भाषणांमध्ये नाही, तर मैदानावर, रस्त्यांवर, रुग्णालयात आणि तरुणांच्या आयुष्यात दिसायला हवा अशी ठाम भूमिका आजची तरुण पिढी घेत आहे.
सुसज्ज मैदानाची आवश्यकता
शहरात एकही दर्जेदार सार्वजनिक खेळाचे मैदान नसल्याने लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळेच खेळासाठी खासगी टर्फवर पैसे खर्च करण्यास हतबल झाले आहेत. पोलिस व लष्कर भरतीची तयारी करणारे तरुण रस्त्यावर धाव घेताना दिसतात, कारण सरावासाठी एकही सुसज्ज मैदान उपलब्ध नाही.
आरोग्य सेवा डळमळीत
जिल्हा रुग्णालय असूनही आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व अद्ययावत उपचार व्यवस्था नसल्याने गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे वळावे लागत आहे. शासकीय दवाखाने केवळ नावापुरते उरले असून, आरोग्यसेवा ही तरुणांच्या मते ‘दुय्यम’ ठरली आहे.
प्रशिक्षण केंद्राचा अभाव
शिक्षणाच्या बाबतीतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. शासकीय शाळा व महाविद्यालयांचा अभाव, आधुनिक शिक्षण सुविधा नसणे, तसेच खेळात किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एकही सक्षम प्रशिक्षण केंद्र नसणे या सगळ्यामुळे तरुणांची स्वप्ने शहरातच खुंटत आहेत.
उल्हासनगरचा विकास केवळ फाईल्स, जाहिराती आणि भाषणांपुरताच मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्षात मात्र शहरातील तरुणांना मैदान नाही, रोजगार नाही, दर्जेदार शिक्षण नाही आणि मूलभूत आरोग्य सुविधांचाही अभाव आहे. ही परिस्थिती नक्की कोणत्या विकासाचे प्रतीक आहे? तेच तेच चेहरे वर्षानुवर्षे सत्तेत राहून शहराला मागे नेत आहेत. आता तरुणांनी गप्प बसायचे नाही. फक्त आश्वासने नकोत, ठोस काम हवे आहे. उल्हासनगरच्या भविष्यासाठी नवे, निर्भीड आणि कार्यक्षम नेतृत्व घडवण्याची हीच योग्य वेळ आहे.
- ॲड. तन्मेष उदय देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

