पोलिसांच्या सेवा मिळणार ऑनलाईन
टोकावडे, ता. ८ (बातमीदार) : राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ या अधिकृत पोर्टलवरून पोलिस दलाशी संबंधित विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चारित्र्य पडताळणी, भाडेकरू माहिती नोंदणी, हरवलेल्या वस्तूंची तक्रार; तसेच विविध परवानग्यांसाठी आता नागरिकांना पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. या डिजिटल प्रणालीमुळे पोलिस सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी ठरत आहे.
पूर्वी या कामांसाठी नागरिकांना वारंवार पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा स्वतःच्या मोबाईलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येत आहे. विहित कालावधीत डिजिटल स्वाक्षरीसह दाखले उपलब्ध होत आहेत. अर्जाची सद्यस्थिती तपासण्याची सुविधाही पोर्टलवर देण्यात आली आहे. या ऑनलाईन सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे. डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे पाऊल पोलिस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करणारे ठरत आहे. भविष्यात अधिकाधिक सेवा ऑनलाईन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऑनलाईन उपलब्ध सेवा
चारित्र्य प्रमाणपत्र : नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी आवश्यक असलेले चारित्र्य प्रमाणपत्र आता ऑनलाईन अर्जाद्वारे सहज मिळते.
भाडेकरू माहिती नोंदणी : घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची माहिती ‘आपले सरकार’ पोर्टलवरून किंवा सेवा केंद्राच्या माध्यमातून थेट पोलिसांकडे नोंदवता येते.
हरवलेल्या वस्तूंची नोंद : मोबाईल, पाकीट, कागदपत्रे किंवा इतर वस्तू हरवल्यास ऑनलाईन तक्रार नोंदवून तत्काळ पोलिस पावती डाऊनलोड करता येते.
परवाने व ना-हरकत प्रमाणपत्रे : लाउडस्पीकर परवानगी आणि विविध कार्यक्रमांसाठी लागणारी ना-हरकत प्रमाणपत्रे मिळत आहेत.
वेळ आणि पैशांची बचत
ऑनलाईन सुविधांमुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. घरबसल्या किंवा जवळच्या सेवा केंद्रातून अर्ज करून निश्चित कालावधीत सेवा मिळत असल्याने नागरिकांचा विश्वास या प्रणालीकडे वाढत आहे.
असा करा अर्ज
* aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
* ‘गृह विभाग’ निवडा.
* आवश्यक सेवा निवडून संबंधित कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर अर्ज संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग केला जातो.
दलालापासून दूर राहण्याचे आवाहन
पोलिस दलाचे डिजिटायझेशन हे पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी अधिकृत ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करून दलाल किंवा मध्यस्थांपासून दूर राहावे, असे आवाहन मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासो एडके यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

