नवी मुंबईतील १९ प्रदूषणकारी बांधकामे बंद

नवी मुंबईतील १९ प्रदूषणकारी बांधकामे बंद

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : प्रदूषणाबाबत नियमांची पूर्तता करण्याच्या नोटीस देऊनही पूर्तता न करणाऱ्या १९ प्रदूषणकारी बांधकामांवर अखेर महापालिकेने कारवाई केली आहे. अशा १९ बांधकामांना काम थांबवण्याची कारवाई केली आहे, तर ४२ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे यापूर्वीच २०२४मध्ये २७ मुद्द्यांचा समावेश असलेली वायू प्रदूषण नियंत्रक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचे निरीक्षण व अंमलबजावणीकरिता विभागीय स्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या अनुषंगाने डिसेंबरमध्ये वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या ४२ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हिवाळी कालावधीत वारा वाहण्याचे प्रमाण संथ असल्याने आणि वेगवान वाऱ्याच्या अभावाने तसेच वातावरणात आर्द्रता असल्याने जमिनीलगतची प्रदूषके उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हवेत धुरक्यासारखी स्थिती असते. त्यामुळे नवी मुंबईत दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत वायू प्रदूषणात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महापालिकेने यापूर्वीच २०२४मध्ये २७ मुद्द्यांचा समावेश असलेली वायुप्रदूषण नियंत्रक मार्गदर्शक तत्त्वे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध केली आहेत. त्या अनुषंगाने ‘जीआरएपी-४’ अंतर्गत शहराच्या ज्या भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० पेक्षा अधिक आढळला आहे. अशा १९ ठिकाणांवर सुरू असलेली बांधकामे थांबविण्यात आलेली आहेत.

बांधकाम ठिकाणांवरील प्रदूषण नियंत्रणाकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक बांधकाम स्थळी हवा गुणवत्ता मापक उपकरणे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० बांधकाम स्थळांवर ही उपकरणे बसविण्यात आली असून, उर्वरित बांधकामांवर उपकरणे बसविण्याचे काम सुरू आहे.

या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता विभागीय स्तरावर संबंधित विभाग अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली स्थापत्य उपअभियंता, स्वच्छता अधिकारी/निरीक्षक, नगररचना उपअभियंता अशा अधिकाऱ्यांचे भरारी पथक स्थापित करण्यात आले आहे. या पथकांमार्फत विभागीय क्षेत्रातील बांधकाम व निगडित बाबींची तपासणी करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळावरील निर्देशांक तपासा
सानपाड्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद ही समीर ॲप आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून घेतलेली असणे महत्त्वाचे आहे. तथापि बहुतांशी वेळा ही माहिती त्रयस्थ संस्थांकडून पुरविल्या जाणाऱ्या कमी दर्जाच्या सेन्सर मॉडेल्स, क्राउड-सोर्स डेटा आधारित अनुमान किंवा उपग्रह आधारित अंदाज येथून घेतली जाते. त्यावर आधारित अंदाज व्यक्त केले जातात. ते केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कॅलिब्रेशन व प्रमाणीकरण प्रक्रियेचे पालन करीत नाहीत. त्यामुळे त्याची सत्यता अधिकृत स्रोतांशी पडताळून पाहणे आवश्यक आहे.

वायू प्रदूषणाला कारणीभूत प्रकल्पांवर कारवाई
बांधकाम स्थळांना सूचनापत्रे ३२
कारणे दाखवा नोटिसा १०
काम बंद नोटिसा १९
विकसकांना दंडात्मक नोटिसा १७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com