भिवंडीत बंडखोर देणार युतीच्या उमेदवारांना धक्का
भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) युतीसमोर बंडखोर उमेदवारांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. युतीतील अनेक नाराज नेते व माजी नगरसेवकांचे नातेवाईक अपक्ष किंवा इतर पक्षांच्या तिकिटांवर निवडणूक लढवत असल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे बंडखोर एकप्रकारे महायुतीच्या उमेदवारांना ‘शह’ देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
भिवंडी महापालिकेच्या ९० जागांसाठी एकूण ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नव्या प्रभाग रचनेमुळे तिकीट वाटपात अनेक इच्छुकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे) युतीतील दीड डझनहून अधिक बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. विशेषतः हिंदूबहुल भागांमध्ये हे बंडखोर युतीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. परिस्थिती अशी आहे की, काही प्रभागांमध्ये शिवसेना (शिंदे) किंवा भाजपच्या उमेदवारांचे पुत्र, पत्नी किंवा नातेवाईकच थेट दुसऱ्या पॅनलविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. काही ठिकाणी शिंदेचे उमेदवार भाजप पॅनलविरुद्ध, तर भाजपशी संबंधित उमेदवार शिवसेना पॅनलविरुद्ध उभे ठाकले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंडखोर उमेदवारांचे म्हणणे आहे की, ज्या वॉर्डमधून ते निवडणूक लढवत आहेत, तेथील तिकीट वाटपात अन्याय झाला आहे. तिकीट कापण्यात भूमिका बजावणाऱ्यांना पराभूत करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे ते उघडपणे सांगत आहेत. त्यामुळे सध्या तरी भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुती बंडखोरांसमोर असहाय्य दिसत आहे.
प्रभाग क्रमांक १६
पद्मानगर येथील प्रभाग क्रमांक १६-अ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक कल्याणपद्मा भूमेश यांचे तिकीट पक्षाने रद्द केल्यानंतर ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक १६-ब मध्ये भाजपच्या महिला सरचिटणीस डिंपल व्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. प्रभाग १७-अ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुरली मच्छा व वासम अरुण राजेंद्र हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
अपक्ष निवडणूक
प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपने तिकीट नाकारल्यामुळे सरचिटणीस राजू गजेंगी यांच्या पत्नी लता गजेंगी, माजी भाजप नगरसेवक दीपाली दिनेश पाटील तसेच भाजप उत्तर भारतीय आघाडीचे माजी अध्यक्ष मनोज सिंह यांची कन्या स्नेहा सिंह या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीत तणाव वाढला आहे.
नाराजी
प्रभाग क्रमांक २१ मध्ये शिंदे पॅनलकडून भाजपचे वॉर्ड क्रमांक २३ चे उमेदवार नीलेश चौधरी यांच्या पत्नी दक्षिता चौधरी निवडणूक लढवत आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले श्याम भोईर, माजी नगरसेवक साईनाथ पवार यांचे पुत्र विराज पवार तसेच सिद्धी पाटील हे जय हिंद सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. शिंदे गट वॉर्ड क्रमांक २२ चे उमेदवार मनोज काटेकर यांचे पुत्र तेजस काटेकर हे प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजप पॅनलविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.
महायुतीसमोर अडचणी
भिवंडीत भाजप हिंदूबहुल भागांत ३० जागांवर, तर शिवसेना (शिंदे) युती २० जागांवर निवडणूक लढवत आहे. यापैकी भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र उर्वरित जागांवर बंडखोरी आणि स्थानिक पातळीवरील अंतर्गत कलहामुळे महायुतीस अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

