परराज्यात मराठीचा ठसा
परराज्यात मराठीचा ठसा
हिंदी भाषक मुलांचा पालघरमध्ये प्रवेशोत्सव
पालघर, ता. ८ : जिल्ह्यामध्ये हिंदी भाषक अकुशल कामगारांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाली आहेत. अशा कुटुंबांतील लहान मुलांना मराठी माध्यमाच्या अंगणवाडी तसेच शाळांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे परराज्यातही आता मराठीचा ठसा उमटणार आहे.
मध्य प्रदेश झाबुआ प्रांतातील हजारो कुटुंबे पालघर जिल्ह्यातील शहरी आणि निमशहरी भागात सुरू असलेल्या इमारत बांधकाम साइटवर काम करीत आहेत. ही कुटुंबे तिथेच भोंगे बांधून वास्तव्य करीत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आल्यानंतर हिंदी भाषक विद्यार्थ्यांना मराठी अंगणवाडी, शाळांच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पालघरमधील रजनी कमल पार्क येथील ज्येष्ठ नागरिक भवनच्या अंगणवाडी केंद्रामध्ये बुधवारी परभाषक कुटुंबातील लहान मुलांना अंगणवाडीला जोडून घेण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महिला व बालविकास अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते, स्पर्श फाउंडेशनच्या ऋतू संखे उपस्थित होते.
----------------------------------------------
शिक्षणापासून वंचित
- हजारो परभाषक कुटुंबे कामासाठी जिल्ह्यात येतात. कामाच्या ठिकाणी वस्ती किंवा तांड्याने राहतात. अशा कुटुंबांतील बालके, मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले होते. तिथूनच मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.
- या मुलांना प्रवाहात आणण्याची चक्रे जोरदार फिरली. अखेर या मुलांना अंगणवाडी आणि शाळेमध्ये प्रवेश दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांच्या हस्ते शालेय गणवेश, पुस्तकांचा संच, खाऊ देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.
--------------------------------------------
‘स्पर्श’चा पुढाकार
पहिल्याच प्रयत्नात २० ते २२ मुले मराठी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. या उपक्रमात बालकांचा शोध घेण्यात ‘स्पर्श’ सामाजिक संस्थेने महत्त्वाचे योगदान दिले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी मुलांच्या प्रवेशोत्सवासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे ही परभाषक मुले सहा-आठ दिवसांपासून सातत्याने शाळेत येत आहेत. तसेच इतर मुलांमध्ये आनंदाने मिसळून गेली आहेत.
----------------------------------------
पालघर जिल्ह्यातील शहरी, निमशहरी भागांमध्ये सर्वेक्षण करून जिल्ह्यासह परराज्यातील अशा कुटुंबीयांच्या मुलांना अंगणवाडी, शाळांमध्ये जोडून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोहीम आखली जाईल. एकही मूल शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

