भिवंडीत निवडणूक प्रचारात राडा
भिवंडीत निवडणूक प्रचारात राडा
भाजप-कोणार्क विकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले
भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, बुधवारी (ता. ७) रात्री कोणार्क विकास आघाडीच्या सभेत भाजप समर्थकांनी शिरून गोंधळ घातल्याची घटना घडली. कोंबडपाडा येथील गणपती मंदिर परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक १मध्ये कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील, विलास पाटील, नेहा काठवले आणि मयूरेश पाटील यांची परवानगी घेऊन कॉर्नर सभा सुरू होती. या वेळी भाजप आमदार महेश चौघुले यांचे समर्थक आणि उत्तर मंडळ अध्यक्ष भावेश पाटील यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांनी सभेत शिरून महिलांना शिवीगाळ व धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बंदोबस्तावर पोलिस हजर असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाटील समर्थकांनी ‘११२’ क्रमांकावर फोन केल्यानंतर अतिरिक्त पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिस ठाण्यात गदारोळ आणि गुन्हे दाखल
घटनेनंतर प्रतिभा पाटील यांनी समर्थकांसह निजामपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. अखेर सपना कुमार भोईर यांच्या तक्रारीवरून भावेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी भावेश पाटील यांच्या तक्रारीवरून कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवारांवरही गुन्हा नोंदवण्यात आला.
आमदारांचा दबाव
या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी महापौर प्रतिभा पाटील म्हणाल्या, की विरोधकांनी निवडणूक प्रचाराने लढवावी, गुंडगिरीने नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी झटत असताना भिवंडीत मात्र महिला सुरक्षित नाहीत. पोलिस सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली काम करीत आहेत.
वादाची पार्श्वभूमी
प्रभाग १मध्ये भाजपने आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौघुले यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले आहे. विलास पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार चौघुले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, तेव्हापासून या दोन गटांत राजकीय वैमनस्य असल्याचे बोलले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

